सांगली - मिरज शासकीय रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलेला नवजात अर्भकासह जमिनीवर झोपावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोनाली गाडे, असे या प्रसूती झालेल्या महिलेचे नाव आहे.
सोनाली प्रसूतीसाठी मिरजेमधील शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती. सोमवारी रात्री तिची प्रसूती झाली. यानंतर तिला रूग्णालयात बेड उपलब्ध होऊ न शकल्याने जमिनीवर आपल्या नवजात अर्भकास झोपावे लागले. यामुळे हा संतापजनक प्रकार सोनालीच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर रूग्णालय प्रशासनाकडून महिला रुग्णांची संख्या अधिक असल्याने बेड उपलब्ध होऊ शकला नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले.
रूग्णालय अधीक्षकांचे स्पष्टीकरण
रूग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. मात्र, प्रसूती महिलांच्यासाठी राखीव असणारे बेड आणि जागा यांची उपलब्धता कमी पडत असल्याने हा प्रकार घडला. रूग्णालयात अधिक बेड वाढवून देण्याची मागणी शासन दरबारी करण्यात आली आहे. तसा प्रस्ताव तयार करण्यात येत असून तो मंजूर झाल्यास रुग्णांना अधिक सुविधा देणे शक्य होणार आहे, अशी माहिती रुग्णालय अधीक्षक डॉक्टर धुमाळ यांनी दिले.
यापूर्वीही घडल्या आहेत अशा घटना
नुकतेच एका महिलेला ग्रामीण रूग्णालयात प्रसूतीसाठी नाकारल्याने तिची एसटी शेड मध्ये प्रसूतीची घटना घडली होती. तर गरोदर महिलेची हेळसांड केल्याने बाळासह तिचा मृत्यू झाल्याची घटना ग्रामीण रूग्णालयात समोर आली होती. अशात मिरज शासकीय रूग्णालयात प्रसूती झालेल्या महिलेला नवजात अर्भकासह जमिनीवर झोपावे लागल्यामुळे आरोग्य यंत्रणेचा अनोगोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.