सांगली - दहावीची परीक्षा देऊन परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीला सांगलीच्या कुमठेजवळ भीषण अपघात झाला. यामध्ये चालक ठार झाला, तर ५ विद्यार्थ्यांसह ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
तवेरा आणि मालवाहू छोटा टेम्पो गाड्यांची समोरा-समोर धडक झाल्याने हा अपघात घडला. जखमींवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज दुपारी दहावीची परीक्षा देऊन परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीला सांगलीच्या तासगावजवळ कुमठे फाटा येथे अपघात घडला. यामध्ये एका गाडीचा चालक ठार झाला आहे. आजपासून दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. कुमठे गावातील विद्यार्थी आज पहिला पेपर देण्यासाठी जवळच्या कवलापूर या गावी गेले होते. पेपर संपवून परत जात असताना विद्यार्थ्यांच्या तवेरा गाडी आणि समोरून येणारा छोटा मालवाहक टेम्पो या गाड्यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला.
या अपघातात मालवाहक टेम्पोचा चालक जागीच ठार झाला, तर तवेरा गाडीमधील चालकांसह ९ जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये २ विद्यार्थी आणि तवेरा गाडीच्या चालकाची प्रकृती चिंताजनक आहे. यामध्ये मालवाहू गाडीतील ३, तर तवेरा गाडीतील ६ जणांचा समावेश आहे. या भीषण अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच खासदार संजय पाटील, काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, काँग्रेस युवक नेते विशाल पाटील, जिल्हा परिषद आरोग्य सभापती तामनगौडा रवी पाटील यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. या घटनेची सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
जखमी विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे-
आदित्य पाटील (वय १६), आकाश पाटील (वय १६), वेदांत गावडे (वय १६), शुभम भोसले (वय १६), सुमित गावडे (वय १६), प्रशांत पाटील (वय ३५), लक्ष्मण पवार (वय ४०), ऋतुराज भंडारी (वय १६), एक अनोळखी (वय ३२)