सांगली- ४०० वर्षाच्या वटवृक्ष तोड प्रकरणाची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी दखल घेतली आहे.याबाबत अहवाल मागवत सांगलीच्या प्राशसनाला झाड न तोडण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्या आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना याबाबतचे पत्र पाठवले आहे.
मिरज-पंढरपूर रोडवरील महामार्गाच्या रस्त्याच्या कामासाठी मिरज तालुक्यातील पंढरपूर रोडवर असणाऱ्या भोसे येथील सुमारे चारशे वर्षे जुना असणारा वटवृक्ष तोडला जाणार आहे. हा वटवृक्ष वाचवण्यासाठी ग्रामस्थ आणि वृक्षप्रेमी संघटनांनी बुधवारी चिपको आंदोलन केले होते, तर सोशल मीडियावरही झाड वाचवण्याची मोहीम चालवली होती. या जुन्या वृक्षाच्या संवर्धनाच्या मोहिमेची राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दखल घेतली आहे. मंत्री ठाकरे यांनी सांगली जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन हा वटवृक्ष वाचविण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी,अशा सूचना दिल्या
सांगली जिल्हा प्रशासनाकडून महावटवृक्षाचा अहवाल मागविला आहे. तसेच या बाबत ठोस निर्णय होई पर्यंत प्राशसनाला झाड तोडू न देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्याच बरोबर मंत्री ठाकरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना चारशे वर्ष पुरातन वटवृक्ष वाचविण्यासाठी पत्राद्वारे विनंती केली आहे.
आपल्या विभागामार्फत रत्नागिरी - कोल्हापूर - मिरज - सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ चे काम सुरु आहे. या नियोजित रस्त्याच्या कामामुळे परिसरातील शेतकरी बांधव आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. मात्र, सांगलीच्या मिरज ते पंढरपूर या शहरांच्या दरम्यान हा महामार्गाचे काम सुरु असणाऱ्या भोसे याठिकाणी यल्लमा देवीचे पुरातन मंदीर असून या मंदिरासमोरच सुमारे ४०० वर्षापूर्वीचा महाकाय वटवृक्ष आहे. त्याचा विस्तार सुमारे ४०० चौ.मी. इतका व्यापक आहे. हा वटवृक्ष त्या परिसरातील एक ऐतिहासिक ठेवा तर आहेच,त्याचबरोबर ते वटवाघुळ आणि इतर दुर्मिळ पक्षी यांच्याकरीता नैसर्गिक निवासस्थान देखील आहे, असे केंद्रीय मंत्री गडकरी यांना लिहिलेल्या पत्रात आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
नियोजित राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ च्या कामामुळे या पुरातन वटवृक्षास बाधा पोहोचत असल्याने वटवृक्ष तोडावे लागेल किंवा पर्यायी जागेवरुन रस्ता करावा लागेल,असे मिरज उपविभागीय अधिकारी यांच्या अहवालात नमूद केलेले आहे.त्यामुळे या वटवृक्षाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता तसेच परिसरातील पर्यावरणाच्या होणाऱ्या -हासाचा विचार करता भोसे येथील संबंधीत जागेवरील महामार्गाचे संरेखन काही प्रमाणात बदलून वटवृक्षाचे जतन होण्याबाबत कार्यवाही करण्याची विनंती मंत्री ठाकरे यांनी मंत्री गडकरी यांना केली आहे.
महाराष्ट्र शासनाकडे ऑनलाईन याचिका
सोशल मीडियामध्ये शिवकालीन वटवृक्ष वाचविण्यासाठी राज्यभर जोरदार मोहीम उभी राहिली आहे.हा वटवृक्ष वाचवण्यासाठी सांगली जिल्ह्यातील निसर्गप्रेमी आणि औरंगाबाद येथील प्रयास युथ फाऊंडेशन यांनी ऑनलाइन याचिका दाखल केली आहे.सुमारे तीन हजार पेक्षा जास्त लोकांनी यामध्ये सहभाग घेऊन झाड तोडण्यास विरोध दर्शविला आहे.