सांगली- जिल्ह्यातील कवलापूर येथे साकारण्यात आलेला किल्ले पन्हाळगड हा चर्चेचा विषय बनला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्वत: येऊन या किल्ल्याचे उद्घाटन केले आहे. भव्य-दिव्य असा हा पन्हाळागड किल्ला पंचक्रोशीत सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
कवलापूरमध्ये पन्हाळा किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. कवलापूरमधील स्वराज्य दौलत दुर्गनाद प्रतिष्ठानाकडून ही प्रतिकृती साकारण्यात आली असून श्रीमंत संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते या किल्ल्याच्या प्रतिकृतीचे उद्घाटन करण्यात आले आहे. शिवाजी महाराजांनी ज्या गडकोट किल्ल्यांना स्वराज्यलक्ष्मी मानले, अशा गडकोट किल्ल्यांची माहिती आणि जागृती नवीन पिढीला व्हावी या उद्देशाने कवलापूरमधील स्वराज्य दौलत दुर्गनाद प्रतिष्ठान दरवर्षी दिवाळीत शिवाजी महाराजांनी उभारलेल्या किल्ल्यांची प्रतिकृती उभारत असते.
यंदा प्रतिष्ठानाने पन्हाळगडावर ५ अभ्यास दौरे करून या किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. ३५ बाय ६० फुट असणारी ही प्रतिकृती साकरण्यासाठी २ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागला आहे. तर, हा किल्ला उभारण्यासाठी तब्बल दिड लाखावर खर्च आला आहे. गत वर्षी या मंडळाकडून विजयदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती साकारली होती. तर यावेळी पन्हाळगड साकारण्यात आले आहे. आणि छत्रपती संभाजीराजेंनी देखील या पन्हाळा किल्ल्याची प्रतिकृती पाहून आनंद व्यक्त करत या कामाचे कौतूक केले आहे.
हेही वाचा- मंत्रिमंडळाची एक तरी बैठक रायगडावर घ्या- खासदार छत्रपती संभाजीराजे