इस्लामपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी रक्तदान शिबिर घेण्याचे जाहीर केले होते. माणुसकीचे नाते या ग्रुपच्या व्यवस्थापनात 1 मे ला महाराष्ट्र दिनानिमित्त हे रक्तदान शिबीर पार पडले. या शिबिरात इस्लामपूर व परिसरातील एकूण 662 युवक व नागरिकांनी रक्तदान केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेला रक्ताचा तुटवडा यामुळे होणारे रुग्णांचे हाल , याउद्देशाने ' माणुसकीचं नातं ' या ग्रुपच्या माध्यमातून पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे, उद्योगपती सर्जेराव यादव, पो.नि. नारायण देशमुख यांनी या ग्रुपवरील सदस्यांच्या माध्यमातून रक्तदान करण्यासाठी आवाहन केले होते.
देशात आणि त्याचबरोबर राज्यातील कोरोनाची परिस्थिती भयंकर आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रक्तदान शिबीरे न झाल्याने रक्तपेढ्या रिकाम्या पडल्या आहेत. रक्ताचा तुडवडा असून, रक्त मिळत नसल्याने रुग्ण तडफडत आहेत, काहींना जीवही गमवावे लागत आहेत. ही गरज ओळखून पिंगळे यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
माणुसकीचे नाते या ग्रुपचे सामाजिक दायित्व-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या या ग्रुप च्या माध्यमातून गेले वर्षभर असे काम अविरत सुरू आहे. मागील लॉकडाऊनच्या काळात रोजगार करणाऱ्या, हातावरचे पोट असलेल्या, परप्रांतीय हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्यावेळी या ग्रुपच्या माध्यमातून अनेक मदतीचे हात पुढे आले. आणि जवळ जवळ ४५० कुटुंबाना जेवणाचे, अन्नधान्याचे किट सलग तीन महिने पुरवण्याचे काम केले गेले.
महाराष्ट्र दिनी झालेल्या रक्तदान शिबिरात राजारामबापू ब्लड बँक,इस्लामपूर- ३२४
मानस ब्लड बँक,सांगली- २५४
कृष्णा ब्लड बँक,कराड- ५६
डॉ.डी.वाय.पाटील ब्लड बँक,कोल्हापूर- २८ असे चार ब्लड बँकांच्या माध्यमातून एकूण ६६२ रक्तदात्यांनी विक्रमी रक्तदान केले.