सांगली - कोरोनाच्या विळख्यात असणाऱ्या सांगली जिल्ह्यात आता म्यूकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 61 जणांना काळ्या बुरशीच्या म्यूकरमायकोसिसची लागण झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. कोरोनाची रोजची रुग्णसंख्या ही हजाराच्या पुढे आहे. अशा परिस्थितीमध्ये आता म्यूकरमायकोसिस या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या 15 दिवसात जिल्ह्यातील विविध भागात 61 म्यूकरमायकोसिसचे रूग्ण आढळून आले आहेत. सांगली महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात शासकीय व खाजगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. मिरजेच्या शासकीय कोरोना रुग्णालयात यासाठी स्वतंत्र उपचार यंत्रणा सुरू केली आहे. तसेच याबाबत नाक, कान आणि डोळे तज्ञ डॉक्टरांची समिती गठित करण्यात आली. या रुग्णांना देण्यात येणाऱ्या इंजेक्शनचा तुटवडा असल्याने म्यूकरमायकोसिस रुग्णांचा जीव टांगणीला आहे.