सांगली - जिल्ह्यामध्ये आज कोरोनाचे आणखी 6 नवे रुग्ण आढळून आले आहेत. शिराळा तालुक्यातील एकाच गावातील हे रुग्ण आहेत, तर दिवसेंदिवस वाढणाऱ्या शिराळा तालुक्यातील रुग्ण संख्येमुळे शिराळा हा हॉटस्पॉट बनला आहे. तर उपचार घेत असलेले 4 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरणा रुग्णांची संख्या 83 झाली असून एकूण कोरोना रुग्णांची संख्या 198 झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली.
आज मणदूर गावातल्या 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 90 वर्षीय व 76 वर्षीय वृद्ध महिला,17 वर्षीय मुलगा, 23 वर्षीय युवक, 50 वर्षीय व्यक्ती आणि 47 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर एकट्या शिराळा तालुक्यात आतापर्यंत जवळपास 50 हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मोठ्या प्रमाणात मुंबईहून लोक शिराळा तालुक्यात आल्याने शिराळा हा जिल्ह्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे.
तर आज दुपारपर्यंत मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार घेणारे 4 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये कडेगाव तालुक्यातल्या नेर्ली येथील 25 वर्षीय व 51 वर्षीय महिला आणि जत तालुक्यातील औंढी येथील 62 वर्षीय पुरुष आणि 30 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. या सर्वांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन 14 दिवसांसाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आले आहे. तसेच एकूण 198 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून यापैकी 108 जण हे कोरोनामुक्त आणि 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.