सांगली - मनात जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस काहीही करू शकतो. याचा प्रत्यय सांगलीच्या झरे गावात आला. झरे येथील ४० वर्षीय राजेश पवार यांनी तब्बल २३ वर्षाने दहावी पास होण्याचा बहुमान मिळवला आहे. ते यंदाच्या वर्षी ५७ टक्के गुण मिळवत दहावी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे आपल्या अकरावीचे शिक्षण घेणाऱ्या मुलीसोबत त्यांनी अभ्यास करत हे यश संपादन केले आहे. त्यामुळे राजेश पवार सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनले आहेत.
राजेश पवार हे मूळचे सातारा जिल्ह्यातील हिंगणी गावाचे रहिवासी. घरची परिस्थिती बेताची होती. त्यातून शिक्षण घेत असताना १९९४ साली राजेश पवार यांनी दहावीची परीक्षा दिली. मात्र, त्यावेळी ते दहावीत नापास झाले होते. एक दोन नव्हे तर तब्बल पाच विषयात राजेश पवार हे नापास झाले. पुढे दहावीची परीक्षा देऊन पास होण्याची प्रचंड इच्छाशक्ती असूनही परिस्थितीमुळे दहावीची परीक्षा राजेश यांना पुन्हा देता आली नाही. पण इलेक्ट्रॉनिक व्यवसायाकडे वळत राजेश यांनी त्या क्षेत्रात नैपुण्य मिळवत चांगले बस्तान बसवले.
सध्या राजेश पवार हे सांगलीच्या खानापूर तालुक्यातील झरे गावात राहतात. राजेश यांना एक मुलगी असून तिने नुकतीच अकरावीची परीक्षा दिली. तर मुलीच्या दहावीनंतर राजेश यांच्या मनातही दहावीची परीक्षा द्यायची इच्छा होती. आपण दहावी नापास आहे, ही गोष्ट राजेश यांच्या मनात सतत घर करून राहिली होती. त्यामुळे या वर्षी दहावीच्या परीक्षेत पास व्हायचं असा निश्चय करत राजेश यांनी दहावीसाठी गावातील शाळेत प्रवेश घेतला आणि आपल्या अकरावीत शिकत असलेल्या मुलगी आरतीसोबत अभ्यास सुरू केला.
राजेश हे दहावीच्या परीक्षेचा प्रवेश घ्यायला गेले असता बऱ्याच जणांनी त्यांना कशाला या भानगडीत पडता, असा खोचक सल्ला दिला. तर परीक्षेला गेल्यावर सर्व विद्यार्थी, विद्यार्थींनी बघून हसायचे. पण राजेश यांनी धीर न सोडता जिद्दीने दहावीची परीक्षा देत पास झाले. वडिलांच्या या यशाचा आनंद झाला असल्याचे मुलगी आरतीने बोलताना सांगितले.