सांगली - जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. शनिवारी दिवसभरात रेकॉर्डब्रेक म्हणजे 366 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील 196 जणांचा समावेश आहे. तर 12 जणांचा मृत्यू झाला. तर याबरोबरच 123 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 6 हजार 159 वर पोहोचली आहे. त्यातील सध्या अॅक्टिव्ह बाधितांची संख्या 2 हजार 753 इतकी आहे. तर आतापर्यंत एकूण 3 हजार 196 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 213 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 247 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली.
दरम्यान, एकिकडे देशात 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना, दुसरीकडे राज्यासह देशावरील कोरोनाचे संकट मात्र अधिकच गहिरे होत असल्याचे दिसत आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून आज (शनिवार) पुन्हा दहा हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात शनिवारी 6 हजार 844 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, आजवर राज्यात कोरोनाचे एकूण 4 लाख 8 हजार 286 रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण 69.82 टक्के एवढे आहे. शनिवारी महाराष्ट्रात 12 हजार 614 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात 1 लाख 56 हजार 409 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.