सांगली - जिल्ह्यातील खेराडे वांगी या गावात कोरोनाबाधिताच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या ३० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मुंबईमध्ये राहणाऱ्या एका रिक्षाचालकावर त्याच्या मूळगावी अंत्यसंस्कार पार पडले. मात्र, त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे मृत्यूनंतर समोर आले होते.
मुंबईमध्ये राहणाऱ्या एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्यावर त्याचा मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर तो कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांसह सर्वजण घाबरले होते. तसेच प्रशासन देखील हादरून गेले होते. त्यानंतर प्रशासनाने त्याच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असणाऱ्या ३० जणांना ताब्यात घेवून त्यांना क्वारंटाईन केले. सर्वांचे स्वॅब घेवून चाचणीसाठी पाठवण्यात आले. तसेच खबरदारी म्हणून खेराडे वांगी हे गाव १०० टक्के लॉकडाऊन करण्यात आले. तसेच ३ किलोमीटरचा परिवार सील करण्यात आला होता. त्यांचा अहवाल आज शुक्रवारी सकाळी प्राप्त झाला असून तिघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासन आणि कडेगाव तालुक्याला दिलासा मिळाला आहे.
काय होते प्रकरण? -
मुंबईत राहणाऱ्या एका रिक्षा चालकावर मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, १८ एप्रिलला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. त्यांनतर त्यांच्या कुटुंबीयांनी कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगी या मूळ गावी १९ एप्रिलला अंत्यसंस्कार केले होते. त्यावेळी कोणालाही मृत व्यक्ती कोरोना बाधित असल्याची कल्पना नव्हती. मात्र, २२ एप्रिलला सायन रुग्णालयाने मृत व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे मुंबई पालिकेला कळवले होते. मृत व्यक्तीला कोरोना लागण झाल्याचे समोर आल्याने अंत्यसंस्कारवेळी उपस्थित असणारे आणि कुटुंबीय हादरून गेले होते.
दरम्यान, सांगलीच्या इस्लामपूर येथे एकाच कुटुंबातील २५ जणांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांच्यावर यशस्वी उपचार होवून सर्वजण बरे झाले आहेत. तसेच एका सांगली, मिरज, कुपवाड महापालिका हद्दीत एकावर उपचार सुरू आहे.