सांगली - पूरस्थिती, गणेश उत्सव, विधानसभा निवडणूक बंदोबस्त, अयोध्या मंदिर प्रकरण बंदोबस्त व सध्या कोरोना महामारी या सर्व संकटात दिपस्थंबासारखे उभे राहून उत्कृष्ट काम करणारा वर्दीतला देवमाणूस म्हणजे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे. गेल्या 3 महिन्यांपाससून वाळवा तालुक्यातील कुरळप पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या 21 गावातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. आपल्या कामातून अरविंद काटे यांनी आपल्या कामाची चुणूक दाखून दिली आहे.
गेल्या तीन महिन्यापासून अहोरात्र गावागावात फिरून स्वतः नागरिकांना माईकवरून सूचना असतील किंवा प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन करण्याचे काम सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांनी केले आहे. तीन महिन्यात एकही दिवस खंड न करता गावात दिवसातून पाच सहा फेऱ्या चालू होत्या. स्वतः रस्त्यावर उतरून लोकांना कोरोनापासून बचाव करण्याच्या सूचना देत होते. यामुळेच पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या 21 गावात कुंडलवाडी वगळता एकाही गावात कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. तर ज्या गावात रुग्ण सापडला त्या कुंडलवाडी गावामध्ये तातडीने गावच्या सर्व सीमा बंद केल्या. गावात चोख बंदोबस्त ठेवल्याने कोरोनाचा प्रसार झाला नाही. तर प्रत्येक गावात सुरूवातीपासूनच औषध फवारणी पासून ते बाहेरील अडकून पडलेल्या मजुरांना जीवनावश्यक वस्तू देण्यापर्यंत काटे यांनी उत्तम जबाबदारी पार पाडली. तर आपल्या दोन वर्षाच्या मुलीला व पत्नीला दहा दिवसात एकदाच व्हिडिओ कॉल करून पाहिले आहे. यामुळे 21गावातील नागरिक आज सुरक्षीत आहेत.
शासनाने शिथिलता दिल्याने पुणे, मुबंई येथून येणाऱ्या नागरिकांची संख्या ओळखून सर्व ग्रामपंचायतीच्या मदतीने त्यांच्या सुरक्षेसाठी गावाच्या बाहेर. जी. प. शाळेमध्ये व्यवस्था करण्यात अली. कुरळप गावाच्या पूर्वेला राष्ट्रीय महामार्ग असल्याने बाहेरील लोक गावात प्रवेश करू शकतील, यामुळे महामार्गावर कडक बंदोबस्त ठेवला होता. तर दक्षिण बाजूस कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारी वारणा नदी असल्याने, कोल्हापूर जिल्ह्यात कामानिमित्त येजा करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे चिकुर्डे पुलावर चेक पोस्ट बसवण्यात आले. तर ऐतवडे खुर्द येथेही नदीवरील पूल बंद करण्यात आला. बाहेरून एकाही व्यक्तीला गावात येऊ दिले नाही. तर कोरोना महामारीचा धुमाकूळ सुरु असताना काही गावातील महाठक अवैध्यरित्या दारू व गुटखा विक्री करत होते. अशा 6 दारू विक्रीत्यांवर व दोन गुटखा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर आठवड्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन अल्पवयीन तरुणांनी वाळवा तालुक्यातील कणेगाव येथील मोटारसायक चोरल्याची घटना घडली होती. तेही चोवीस तासाच्या आत मोटारसायकलसह आरोपींना अटक करण्यात आली होती. यामुळे काटे यांचा कणेगावच्या नागरिकांनी सत्कारही केला. तर ढगेवाडी येथील एक चिमुकलीने काटे यांना पत्र पाठवून आपली कृतन्यता व्यक्त केली होती.
शिवाय ऐतवडे बुद्रुक येथील महिला सरपंच व सन्मती संस्कार मंचच्यावतीने काटे यांचे औक्षणही करण्यात आले होते. कुरळप पोलीस स्टेशनला अरविंद काटे यांना 11 जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. रुजू झाल्यापासून अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूर परस्थिती, गणपती उत्सव, अयोध्या मंदिर प्रकरण बंदोबस्त, विधानसभा निवडणूक बंदोबस्त तोपर्यंत आता कोरोनासारखी महामारी या सर्वांमध्ये अरविंद काटे यांनी कधी प्रेमाने तर कधी बळाचा वापर करून जीवाची बाजी लावून काम केले आहे. यामुळे या सर्व संकटात 21 गावातील नागरिकांना कोणतीही झळ बसलेली नाही. यामुळे सर्व स्तरातून अरविंद काटे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.