सांगली - शिराळा वनपरिक्षेत्रातील बिळाशी परिमंडळ अंतर्गत येणाऱ्या कापरी येथील शेतकरी शामराव निकम यांच्या शेतात नांगरणी दरम्यान नागाची १९ अंडी सापडली. याबाबत सुशीलकुमार गायकवाड यांनी वनविभागाला माहिती दिली. वनपाल सी.पी. देशमुख व सचिन पाटील, वनरक्षक यांनी घटनास्थळावर पोहचून शहनिशा केली; व अंडी ताब्यात घेतली.
वनविभागाने ही अंडी वनविभागाने निरिक्षणाखाली ठेवली होती. त्यामधून १९ पिल्ले निघाल्यानंतर ७ जुलै रोजी या १९ पिल्लांना निसर्गच्या अधिवासात सोडण्यात आले आहे. पी.बी.धानके उपवनसंरक्षक, सांगली वनविभाग, जी.एस.चव्हाण सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनात सुशांत काळे- वनक्षेत्रपाल शिराळा, चंद्रकांत देशमुख यांनी केली आहे. येत्या २५ जुलैला नागपंचमी आहे. याच पार्श्वभूमीवर नागाची १९ अंडी वाचवून त्याचे संवर्धन केल्याने वनविभागाने शेतकरी निकम यांचे आभार मानले आहेत.
वनविभागाशी संबंधित घटनांबाबत नागरिकांनी निशुल्क हेल्पलाइन क्रमांक १९२६ वर संपर्क करण्याचे आवाहन वनविभागामार्फत करण्यात येत आहे.
शिराळा आणि नागपंचमी
शिराळ्यात वर्षानुवर्षे पारंपारिकरित्या नागपंचमी साजरी होत होती. यामध्ये राज्यभरातून नाग आणून त्यांचे पूजन केले जायचे. तसेच नागांचे प्रदर्शन व खेळ देखील या ठिकाणी पार पडत होते. मात्र काही वर्षांपूर्वी कायद्याने यावर बंदी शिराळ्यात प्रतिकात्मक नागपूजा साजरी होत आहे.
शिराळा व परिसर शेती व डोंगराळ असल्याने या परिसरात नागांची संख्या मोठी आहे. या ठिकाणी नाग, धामण, नायकूळ आदींची जपणूक केली जाते. काही अपघात किंवा शेतीची कामे करत असताना हे जखमी झाल्यास त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यात येतात. तसेच सर्प पूर्ण बरे झाल्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात वनखात्याच्या मार्गदर्शनाखाली सोडण्यात येते.
मागील काही वर्षे प्लॅनेट अर्थ फाऊंडेशनचे सदस्य याबाबत अभ्यासपूर्वक काम करत असल्याने अनेक वन्यजीवांचे जीव वाचवण्यात यश आल्याची माहिती पत्रकार दिनेश हसबनीस यांनी दिली.