रत्नागिरी - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात मनाई आदेश जारी आहे. अशा परिस्थितीत १०० हून अधिक लोकांना लग्नसमारंभाला आमंत्रित करून आदेशाची पायमल्ली करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी सकाळी १०. ३० ते १२.३० च्या दरम्यान चिपळूण तालुक्यातील नायशी येथे घडली.
सावर्डे पोलीस ठाण्याचे पो. ना. अभिजीत लक्ष्मण गावणंग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी 21 मार्चला नायशी मोहल्ला येथे एक लग्नसमारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अब्दुल करीम फकीर मुल्लाजी यांनी त्यांचा मुलगा शाहरुख तसेच रशिद महम्मद डिंगणकर आणि जबीन रशीद डिंगणकर (दो. रा. उद्यमनगर रत्नागिरी) यांची मुलगी सिमरन यांच्या लग्नासाठी सुमारे 125 ते 150 लोकांना आमंत्रित केले होते.
हेही वाचा - CORONA VIRUS : 23 मार्च रोजी होणारा दहावीचा पेपर रद्द, नवी तारीख 31 मार्चनंतर
दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात मनाई आदेश जारी केले आहे. त्यात 5 पेक्षा अधिक लोकांना जमाव जमवण्यात मनाई केलेली आहे. मात्र, असे असतानादेखील या विवाहसोहळ्यात आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. याप्रकरणी संशयित अब्दुल करीम फकीर मुल्लाजी, रशीद महंमद डिंगणकर, जबीन रशीद डिंगणकर यांच्यासह लग्न लावून देणाऱ्या हैदर नागौरशी (रा. नायशी) या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास सुरू आहे.