रत्नागिरी : 40 आमदारांच्या निर्णयाबाबत विधानसभा अध्यक्षांसमोर आम्ही आमची बाजू मांडू. विधानसभा अध्यक्ष कोणावरही अन्याय करणार नाहीत. याची आम्हाला खात्री आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवारांनी महायुती सोबत येऊन कोणाचा पोपट मारला, हे सिद्ध झालेले आहे. जे बाकी आहेत त्यांनी पक्षात राहावे. यासाठी चाललेला हा प्रयत्न आहे, असे प्रत्युत्तरही मंत्री सामंत यांनी शिवसेनेला (उबाठा गटाला) दिले आहे. तसेच पोपट मरण्याच्या अनेक तारखा देऊन झालेल्या आहेत. मात्र पोपट काही मेलेला नाही. त्यामुळे उबाठा गटाचे कार्यकर्त्यांना नैतिक पाठबळ देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे असेही सामंत म्हणाले.
शरद पवारांचे गुण घेण्याची गरज : शरद पवार गेली 56 वर्ष देशाच्या, महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. त्यांना मानणारा वर्ग आहे. अजित पवार आमदार घेऊन महायुतीसोबत आलेले आहेत. त्यांनी त्यांचे म्हणणे मांडले आहे. शेवटी राष्ट्रवादीचा तो वैयक्तिक प्रश्न असल्याचे सामंत यावेळी म्हणाले. आम्ही जेव्हा उठाव केला, तेव्हा काही नेत्यांनी सांगितले होते की, मी देखील आता बाहेर पडणार आहे. त्यामुळे शरद पवार वयाच्या 83 व्या वर्षी देखील दिलेल्या शब्दाची पूर्तता दोन दिवसात करतात. ही राजकारणारतली सकारात्मक बाब आहे, असे मला वाटते. त्यामुळे हा चांगला गुण काही लोकांनी घ्यावा, अशी माझी त्यांना विनंती असल्याची टीका सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
आम्ही राजीनामे देणारे नाही घेणारे : राजन साळवी यांचा 9 जुलै रोजी वाढदिवस असून रत्नागिरीत दमदार एन्ट्री वाघाची, असे बॅनर्स लागले आहेत. याबाबत बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, राजन साळवी हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. दमदार एन्ट्री पावसाची देखील झालेली आहे. तशी एन्ट्री त्यांची देखील होईल, आमची देखील राजापूरमध्ये दमदार एन्ट्री झालेली आहे. उद्या त्यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात अशा त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांची इच्छा पूर्ण होत असतानाच शिंदेंचा देखील त्यांनी विचार करावा अशी विनंती सामंत यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजीनामा देणार ही अफवा पसरवण्यात आली होती, आम्ही राजीनामे देणारे नाही, घेणारे आहोत असा टोला सामंत यांनी विरोधकांना लगावला आहे.
हेही वाचा - Sharad Pawar in Yeoala - वयाची भाषा कराल तर महागात पडेल, शरद पवारांचा इशारा