रत्नागिरी - नगर परिषदेच्या नळपाणी योजनेच्या कामांसंदर्भात 28 कामांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे; मात्र सध्या नळपाणी योजना सुरू असताना ही 28 कामे कशासाठी घेण्यात आली आहेत, ही कामे या योजनेत समाविष्ट नाहीत का? आणि ही कामे समाविष्ट असतील तर जनतेच्या पैशाचा अपव्यय का, असा सवाल दक्षिण रत्नागिरी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला असून, याबाबत रत्नागिरी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी खुलासा न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी सावंत यांनी दिला आहे. यावेळी युवा मोर्चाचे अनिकेत पटवर्धनही उपस्थित होते.
रत्नागिरी शहरासाठी नळपाणी योजनेचे काम सध्या सुरू असताना त्यात समाविष्ट असलेल्या 28 कामांची निविदा नगरपरिषदेने काढली आहे. मूळ योजनेत या कामांसाठी तरतूद असताना वेगळी निविदा काढून त्याच कामांवर खर्च करणे हा रत्नागिरीकरांच्या पैशांचा अपव्यय आहे. त्यामुळे यामध्ये भ्रष्टाचाराचा वास येत आहे. याबाबत रत्नागिरी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी खुलासा करावा. अन्यथा भाजपला जनआंदोलन उभे करावे लागेल, असा इशारा राजेश सावंत यांनी दिला आहे.