रत्नागिरी - शेतातील पीक कापून घरी आणल्यानंतर शेतकरी आपले पशुधन चरण्यासाठी मोकाट सोडतात. या पशुधनाचे हिंस्त्र श्वापदांपासून संरक्षण व्हावे यासाठी कोकणात वाघबारस साजरी केली जाते. पूर्वापार चालत आलेल्या प्रथेप्रमाणे मंडणगड तालुक्यात शेतकऱ्यांनी निसर्ग देवतेची आराधना करून पशुधनाचे रक्षण करण्याची निसर्गाला प्रार्थना केली. यातून निसर्ग आणि मानव याचे नाते अधोरेखीत होते.
वाघ, अस्वल, माकड यांच्या रुपात मुलांना रंगवून सजवले जाते. वन्यप्राणी आणि शेतकरी यांच्यातील खेळ काही काळ इथे रंगतो, नंतर अख्या गावाला खिरीचा नैवेद्य दिला जातो. शेतकऱ्यांशी निगडीत असलेली ही अनोखी परंपरा आजतागायत जपली जात आहे.