रत्नागिरी - कचऱ्याच्या गाडीवरील कर्मचाऱ्याने पैसे द्या, अन्यथा कचरा नेण्यासाठी गाडी येणार नाही, असे ग्रामस्थांना सांगितल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथील आहे.
पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या कचऱ्याच्या गाडीवरील कर्मचारी ५० रुपये द्या अन्यथा १ तारखेपासून गाडी येणार नाही, असं या व्हिडिओत सांगत आहे. तर ग्रामपंचायत तुम्हाला पैसे देते मग आम्ही कशाला द्यायचे, असा समोरचा ग्रामस्थ विचारत आहे. यावर हा कर्मचारी आम्ही सगळ्यांकडून पैसे घेतो असं सांगत आहे.
याबाबत पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या सरपंचांना विचारलं असता, त्यांनी आम्ही नियमानुसारच हा कचरा कर घेतो. अधिनियम १२४ (कलम ७) नुसार २० रुपये, ५० रुपये आम्ही दर आकारतो. मात्र, काही ग्रामस्थ हा कर देत नसल्याचे सरपंचांनी सांगितले. सध्या संपूर्ण गुहागर तालुक्यात या व्हिडिओची चर्चा आहे.