रत्नागिरी - उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत आणि मी एकाच विद्यापीठातून पदवी घेतली आहे. सामंत यांच्या पदवीबाबत निर्माण केलेली अफवा चुकीची आहे, असे सांगत भाजपचे नेते आणि माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सामंत यांची पाठराखण केली आहे. चिपळूण येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जेएनयू हल्ल्याचा निषेध -
हल्ला आणि हिंसा याचा निषेध केला पाहिजे. जेएनयूवर झालेल्या हल्ल्याचा निषेधच आहे. ठराविक विचारधारेचे लोक हे मुद्दाम करत आहेत. जेएनयू प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला जाणीवपूर्वक बदनाम केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले असते तर कुणीही नसते -
ठाकरे सरकारमधील मंत्री 'गेट वे ऑफ इंडिया'वर मोर्चा काढून कश्मीर मुक्तीच्या घोषणा देतात. काँग्रेसने बाबरीचे समर्थन केले. राममंदिराला विरोध केला होता. आज बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करण्यास कधीही परवानगी दिली नसती. ठाकरे सरकारमध्ये दुय्यम दर्जाची खाती मिळाली म्हणून अनेकजण नाराज आहेत. शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले असते तर कुणीही नाराज झाले नसते. कारण शिवसेनेला 50 टक्के मंत्रिपदे मिळाली असती. परंतु, निवडणुकीच्या आधीच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ठरले होते, असे तावडे म्हणाले.