रत्नागिरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन सुरू आहे. अत्यावश्यक काम नसेल तर घराबाहेर न पडण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे. मात्र, तरीही रत्नागिरी जिल्ह्यात नियम डावलून काही वाहने रस्त्यावर फिरत होती. अशी नियम डावलून फिरणारी 773 वाहने जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकात जप्त करण्यात आली आहेत.
यामध्ये गुहागर पोलिसांनी सर्वाधिक 173 वाहने जप्त केली. जिल्हा वाहतूक शाखेने 159 वाहने जप्त केली आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर गाड्या मालकांना परत केल्या जाणार आहेत. संचारबंदी असतानाही अनेकजण विनाकारण गाड्या घेऊन रस्त्यावर फिरतात. त्यांना चाप लावण्यासाठी जिल्हा पोलिसांनी सर्व प्रकारचे प्रयत्न केले. सुरुवातीला दंड आकारण्यात येत होता. हा दंडही विक्रमी जमा करण्यात आला आहे. मात्र तरीही नियम मोडून अनेकजण रस्त्यांवर वाहने घेऊन येत. अखेर पोलिसांनी अशी वाहने जप्त करण्यात सुरुवात केली.
22 मार्चपासून तब्बल 773 वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यामध्ये दापोली 17, खेड 92, गुहागर 173, चिपळूण 98, राजापूर 56, मंडणगड 3, लांजा 57 , देवरुख 70, रत्नागिरी ग्रामीण 7 , रत्नागिरी शहर 5, संगमेश्वर 4,आलोरे 14, सावर्डे 18 तर जिल्हा वाहतूक शाखाने 150 दुचाकीसह 9 चार चाकी वाहने असे एकूण 159 गाड्या जप्त केल्या आहेत.