रत्नागिरी - जिल्ह्यात गेले काही दिवस कोरोना लसीचा तुटवडा जाणवत होता, मात्र आता रत्नागिरी जिल्ह्यासाठी कोरोना लसीचे १९ हजार २०० डोस उपलब्ध झाले आहेत. कोरोना लसीचा तुटवडा असल्याने गेले पाच दिवस कोरोना लसीकरण पूर्णतः बंद होते. मात्र, रत्नागिरीच्या शहरी भागात आजपासून लसीकरणाला सुरवात झाली आहे. लसीकरणासाठी सुरवात झाल्याने रत्नागिरी शहरातील लसीकरण केंद्रांबाहेर रत्नागिरीकरांनी रांगा लावलेल्या पहायला मिळत आहेत.
हेही वाचा - विशेष : आंब्याच्या पाठीमागे यावर्षी निसर्गाचं शुक्लकाष्ठ.. आंब्याचा दर काय आहे? कोकणचा आंबा कसा ओळखाल
जिल्ह्याला लसीचे १९ हजार २०० डोस प्राप्त
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मात्र, इतर भागांप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यातही कोरोना लसीचा तुटवडा जाणवत होता. मात्र, सध्या जिल्ह्यात लसीचे १९ हजार २०० डोस प्राप्त झाले आहेत, त्यामुळे रत्नागिरी शहरातील दोन्ही लसीकरण केंद्रांवर आजपासून लसीकरण सुरू झाले आहे. जवळपास ५ दिवसांनंतर लसीकरण सुरू झाल्याने रत्नागिरी शहरातील नागरिकांनी लसीकरण केंद्रांबाहेर रांगा लावलेल्या दिसत होत्या. यापूर्वी केंद्रात येऊनही लस न मिळाल्याने अनेकांनी आज लस घेण्यासाठी गर्दी केली होती. दरम्यान, रत्नागिरी शहरातील झाडगाव आरोग्य केंद्राबाहेरून ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने परिस्थितीचा आढावा घेतला.
आतापर्यंत ८४३३७ लाभार्थ्यांना कोविड लसीचा पहिला डोस
रत्नागिरी जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोविड लसिकरणाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ४५ वर्ष वयावरील नागरिकांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात आले असून, एकूण ८४ हजार ३३७ लाभार्थ्यांना कोविड लसीचा पहिला डोस व १३ हजार २५६ जणांना दुसरा डोस देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात एकूण ६२ प्रा.आ. केंद्र, ७ ग्रामीण रुग्णालय, ३ उप जिल्हा रुग्णालय, १ जिल्हा रुग्णालय, तसेच ३ शहरी प्रा.आ. केंद्र व ७ खासगी रुग्णालये, असे एकूण ११२ लसीकरण केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे.
१६ एप्रिलपासून लसीकरणाला पुन्हा वेग येणार
दरम्यान १६ एप्रिल २०२१ पासून लसीकरणाला पुन्हा वेग येणार असून जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्रा.आ. केंद्र स्तरावर केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे ४५ वर्षांवरील पात्र लाभर्थ्यांना कोविड लस दिली जाणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी सांगितले. तसेच, कोविड लस ही पूर्णतः सुरक्षित असून सर्व पात्र लाभार्थ्यांना नजिकच्या प्रा.आ. केंद्रांच्या ठिकाणी लसीचा लाभ घ्यावा, तसेच ज्यांचा दुसरा डोस शिल्लक आहे त्यांनी योग्य कालावधीनंतर तो घेऊन पूर्ण लसीकरण करून घ्यावे व करोनापासून संरक्षण मिळवावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले.
हेही वाचा - एनआयए किंवा सीबीआय जे करणार आहे, ते भाजपचे लोक आधीच बोलून मोकळे होतात - खा. विनायक राऊत