रत्नागिरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या संचारबंदी आहे. मात्र, अत्यावश्यक कामांसाठी काहीजण बाहेर पडत असतात. यावेळी अनेक नागरिक मास्कचा वापर न करता सर्रास बाहेर फिरताना दिसतात. यामुळेच, आता मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यात आता मास्क न वापरल्यास पाचशे रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
जिल्ह्यात मास्क वापरणे बंधनकारक आहेच. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नव्हती. त्यामुळे, आता जिल्हाधिकारी यांनी घराबाहेर अर्थात सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क बंधनकारक केले आहे. कोणीही नागरिक मास्कशिवाय बाहेर फिरताना दिसल्यास त्याला पाचशे रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. हा नियम ग्रामीण आणि शहरी भागातदेखील लागू आहे.
ग्रामीण भागात ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना हा दंड वसुलीचा अधिकार देण्यात आला आहे. तर, शहरी भागात नगरपालिका आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांना दंड वसुलीचा अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे, रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना आता मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. अन्यथा पाचशे रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.