रत्नागिरी - निराधारांचा आधारवड ठरलेल्या माहेर संस्था हातखंबा येथे आगळावेगळा विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला आहे. माहेर संस्थेत चार वर्षांपूर्वी दाखल झालेल्या मोहन गुरव व सहा महिन्यापूर्वी दाखल झालेल्या सुप्रिया पाडळकर या निराधार जोडप्याचा हा अनोखा विवाह माहेर संस्थेच्या संचालिका सि. लुसी कुरियन यांच्या आशीर्वादाने व माहेर संस्थेचे प्रकल्पप्रमुख सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांच्या पुढाकाराने हा विवाह पार पडला आहे.
संस्थेत येण्याच्या आधी होते दोघेही निराधार
विवाहबद्ध झालेले दाम्पत्य संस्थेत येण्याच्या आधी समाजात एकटेच व रस्त्यावर राहून आपला उदरनिर्वाह करीत होते. मोहन गुरव वय 55 वर्ष यांना साखरपा येथून पोलीस पाटील व सामाजिक कार्यकर्त्यांनी नातेवाईक नसल्याने माहेर संस्थेत दाखल केले होते. तसेच सुप्रिया पाडळकर (वय 50 वर्ष) यांना राजापूरचे नगरसेवक श्री. खलफे व राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन शिंदे यांनी राजापूर बस स्टॅंडवर राहत असल्याने माहेर संस्थेत दाखल केले होते. या दोघांच्या भावनांचा आदर करीत पुढील आयुष्याचा आधार मिळवून देण्याचे काम संस्थेने केले आहे.
विवाहासाठी दानशूर व्यक्तींचे सहकार्य
या विवाह सोहळ्याच्या खर्चासाठी समाजातील दानशूर लोकांना आव्हान करण्यात आले होते. त्यानुसार लोकांनी पुढाकार घेत या विवाहासाठी मदत केली. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात या विवाहाने एकमेकांना आधार दिले आहे. वधू-वराच्या चेहर्यावरील समाधान पाहण्याचा योग माहेर संस्थेमुळे आला व खऱ्या अर्थाने या जोडप्याची नवजीवनाची सुरुवात झाल्याची भावना लूसी कुरियन व सुनील कांबळे यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा -मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये; विनाकारण फिरणाऱ्या शेकडो वाहनांवर कारवाई