रत्नागिरी - शिक्षणापेक्षा संस्कार महत्वाचे आहेत. संतांनी शिक्षण घेतले नव्हते, तरी देखील बहिणाबाई यांनी न शिकता मोठी उंची गाठली. तू शिकलास पण तुला संस्कार कुठे आहेत, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी निलेश राणेंचे नाव न घेता लगावला. ते आज देवरुख येथील जाहीर सभेत बोलत होते.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी आज देवरूख येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर चौफेर टीका केली.
या सभेला शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, महायुतीचे उमेदवार विनायक राऊत, भाजप नेते प्रसाद लाड, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, उपनेते आमदार उदय सामंत, संपर्कप्रमुख सुधीर मोरे,शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, आमदार सदानंद चव्हाण, राजन साळवी आणि माजी आमदार सुभाष बने उपस्थित होते. या सभेला हजारो शिवसैनिक, भाजप कार्यकर्ते यांच्यासह महायुतीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.