रत्नागिरी - विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत यांनी विरोधकांचा धुव्वा उडवत विक्रमी मतांनी विजय मिळवला. आमदार उदय सामंत यांनी विजयाचा चौकार ठोकताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष साजरा केला. उदय सामंत यांनी 87 हजार 463 मतांनी दणदणीत विजय मिळवला. राष्ट्रवादीचे उमेदवार सुदेश मयेकर यांना 31 हजार 18 तर, उदय सामंत यांना 1 लाख 18 हजार 481 मते मिळाली आहेत. कोकणात सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे उमेदवार म्हणून उदय सामंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर साऱ्यांना निकालाची उत्सुकता लागून राहिली होती. गुरुवारी सकाळी 8 वाजता रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला टपाली व सैनिक मतदानाची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएम मशीनच्या मतमोजणीला सुरुवात झाली.रत्नागिरीत शिवसेनेचा विजय निश्चित मानला जात होता. विजय निश्चित असला तरी साऱ्यांना उत्सुकता होती ती मताधिक्याची. अपेक्षेप्रमाणे उदय सामंत यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. सहाव्या फेरीचा निकाल जाहीर होताच राष्ट्रवादीचे उमेदवार सुदेश मयेकर मतमोजणी केंद्रातून बाहेर पडणे पसंत केले.
विजयी चौकार -
येथील मतदारसंघात भगवा फडकला असून उदय सामंत यांनी विरोधकांचा धुव्वा उडवत विजयाचा चौकार ठोकला आहे.चौथ्यांदा विजयश्री खेचून आणणाऱ्या सामंत यांनी विक्रमी मताधिक्य घेतल्याने चार उमेदवारांवर डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली आहे. सलग तीनवेळा विजयाची हॅट्ट्रिक साधून विजयाचा दणदणीत चौकार ठोकत विक्रमी मतांची आघाडी घेत उदय सामंत यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात भगवा फडकवला आहे.