रत्नागिरी - नितीन गडकरींमुळेच मुंबई-गोवा महामार्गाचे काम होते, याबाबत कुठलीही शंका नाही. मात्र, त्यांना कोणीतरी चुकीची माहिती देत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर काम करणाऱ्या एमइपी इन्फ्रा कंपनीचे काम रखडले आहे, याची आधी उत्तरे द्यावी. एमइपीचे म्हैसकर कोण आहे, एमइपी कंपनीचे रखडलेले काम पूर्ण व्हावे म्हणून आम्ही उठाव केला असेल, तर तो काय कॉन्ट्रॅक्टरला त्रास नाही. एमइपीचे काम सोडले, तर बाकी सर्व ठिकाणी काम पूर्ण होत आले आहे. मग एमइपीची आम्ही काय पूजा करायची, अशी संतप्त प्रतिक्रिया देत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नितीन गडकरींना डिवचले आहे.
स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ठेकेदारांवर दबाव टाकणाऱ्या आमदार तसेच खासदारांविरुद्ध केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी थेट केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तक्रार केली आहे. गडकरी यांनी सीबीआयच्या संचालकांकडे जवळपास 22 नावांची यादी सोपविली असून या सर्वांविरुद्ध कारवाई करण्यास सांगितले आहे. त्यामध्ये कोकणातीलही काही लोकप्रतिनिधींच्या नावाची शक्यता आहे. कोकणात सध्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. याबाबत कोकणातील शिवसेनेचे उपनेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना विचारले असता गडकरींमुळेच मुंबई-गोवा महामार्गाचे काम होत आहे याबद्दल कोणतीही शंका नाही. मात्र, त्यांना कोणीतरी चुकीची माहिती देत असल्याची प्रतिक्रिया सामंत यांनी दिली आहे. तसेच आम्ही जनतेसाठी पाऊल उचलले असल्याचे सामंत म्हणाले.