रत्नागिरी - जिल्ह्यात एकाच दिवशी दोन हत्या झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पहिली घटना तालुक्यातील खेडशी गावत घडली तर दुसरी घटना दापोली तालुक्याच्या गणपतीपुळे गावातील पश्चिमवाडी येथे घडली.
रत्नागिरी तालुक्यातील खेडशी येथील मैथिली गवाणकर ही तरुणी आपल्या शेळ्या चरवण्यासाठी रानात गेली होती. संध्याकाळी शेळ्या घरी आल्या. मात्र, मैथिली घरी न आल्याने तिचा शोध सुरू करण्यात आला. त्याचवेळी चिंचवाडी येथे मैथिलीचा मृतदेह सापडला. तिच्या चेहऱ्यावर दगड घालून तिची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुसरी घटना दापोली तालुक्यातील गणपतीपुळे पश्चिमवाडी येथे घडली. अरुण गंगाराम इंदुलकर याने त्याची आई शेवंताबाई इंदुलकर हिची हत्या केली. त्याने कोयत्याने गळा चिरून हत्या केली. त्यानंतर तो स्वतःच शेजारच्या घरात जाऊन आई मेली, असे सांगितले. शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिल्यास हा प्रकार उघडकीस आला. अरूणला विचारपूस केल्यास आईचा राग आल्याने तिला मारून टकल्याचे त्याने सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित अरुण इंदुलकर याला खुनासाठी वापरलेल्या कोयत्यासह ताब्यात घेतले आहे. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक मोहन पाटील करत आहेत.