खालापूर (रायगड) - मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरून पुण्याहून मुंबईकडे सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकचा शिळफाटा जवळील पटेल नगर येथे अपघात झाला. हा अपघात आज (गुरुवार) सकाळी आठच्या दरम्यान झाला. ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने समोरील चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक कारवर जावून धडकली. या भीषण अपघातात ट्रक आणि कार दोन्ही चक्काचूर झाले. तर दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.
ब्रेक फेल झाल्याने नियंत्रण सुटले -
ट्रक एक्सप्रेसवरील खोपोली एक्झिटवरून जुन्या महामार्गाने खोपोलीकडे जात असताना शिळफाटा जवळील पटेल नगर येथील उतारावर आला. याठिकाणी ब्रेक फेल झाल्याने चालकाने ट्रकमधून उडी मारली. त्यामुळे ट्रकने समोरील कारला जोरदार धडक दिली. यात ट्रक चालक आणि पादचारी अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर क्लिनर जखमी झाला आहे.