रत्नागिरी - जिल्ह्याला १६७ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे. या किनाऱ्यावर राहणारे मच्छिमार आणि त्यांचे परिवारांच्या मतदानाचे प्रमाण केवळ ३० ते ४० टक्के इतके कमी आहे. ते वाढून १०० टक्के व्हावे यासाठी मतदार जागृतीसाठी २०० बोटींची किनाराफेरी रत्नागिरीत काढण्यात आली.
लोकसभा निवडणुकीत सर्व मच्छिमार बांधवानी १०० टक्के मतदान करावे, असे आवाहन रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा रत्नागिरी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी केले. याला प्रतिसाद देत १८ एप्रिलनंतर मतदान होईपर्यंत एकही होडी समुद्रात जाणार नाही, असा निर्णय मच्छिमारांनी घेतला. उपक्रमाच्या संकल्पनेबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांचे मी अभिनंदन करतो, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
स्व्हीप अंतर्गत २०० बोटींचा समावेश असणारी आगळी किनारा फेरी काढण्यात आली. स्व्हीप कार्यक्रमाच्या प्रमुख असलेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम झाला. या कार्यक्रमास पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय आनंद पालव, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, लिड बँक व्यवस्थापक अडसूळ, पर्ससीन मच्छिमार मालक असोसिएशनचे अध्यक्ष विलास सावंत, उपाध्यक्ष नासीर वाघू, सचिव जावेद होडेकर, जिल्हा मच्छिमार संघाचे अध्यक्ष सुलेमान मुल्ला, आदर्श मच्छिमार सोसायटीचे इम्रान मुकादम आदींची मुख्य उपस्थिती होती.