रत्नागिरी - पश्चिम बंगालहून फसवून आणलेल्या व गेले दोन महिने अनैतिक व्यवसायाच्या खाईत लोटल्या गेलेल्या दोन मुलींची हेल्प फाऊंडेशनने चिपळूण पोलिसांच्या मदतीने सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेऊन पॉक्सो कायद्यांतर्गत अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या दोन मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर अत्याचार झाल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी करण्यास सुरुवात केली असून, हा अनैतिक व्यवसाय किती दिवस सुरू होता? तसेच यामध्ये कोण-कोण सहभागी आहेत? याचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नोकरीचे आमिष दाखवून आणले -
खेर्डी येथे भाजीपाला व्यवसाय करणारा मोहम्मद शेख याने पश्चिम बंगाल येथील दोन तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून येथे आणले होते. यातील एका मुलीचे वय अवघे १६ वर्षे आहे. या दोघीना नंतर मारहाण, धमक्या देत गेले दोन महिने अनैतिक व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आले. यासंदर्भात हेल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष सतीश कदम यांच्याकडे माहिती येताच त्यांनी तातडीने खेर्डी येथे या पीडित मुलींची भेट घेतली. यावेळी संस्थेचे सदस्य श्रीधर भुरणही होते. या दोन्ही मुलींनी आपल्यावरील शारीरिक व मानसिक अत्याचाराची कहाणी सांगितली.
सापळा रचून आरोपीला अटक -
त्यानंतर सतीश कदम यांनी त्यांना धीर देत तेथूनच पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांना या गंभीर प्रकाराची कल्पना दिली. त्यानंतर पोलिसांनी एक टीम साध्या वेषात खेर्डीमध्ये पाठवली. यावेळी त्यांच्यासोबत हेल्प फाऊंडेशनचे पदाधिकारीही होते. यावेळी सापळा रचून संशयिताला पकडण्यात आले. या प्रकरणी मोहम्मद शेख याच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केली असता, न्यायालयाने त्याला ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - कोरोनावर लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट कंपनीचा इतिहास