रत्नागिरी- मिरजोळे एमआयडीसीमध्ये छापा टाकून जप्त करण्यात आलेल्या ५० लाखांच्या कोकेन प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. याप्रकरणी आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यापैकी मुकेश शेरॉन असे चेन्नईतून अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तो हवाई दलाचा कर्मचारी असून या प्रकरणातील मास्टर माईंड आहे. या प्रकरणात अगोदर तटरक्षक दलाच्या दोन जवानांसह तिघांना अटक करण्यात आली होती, त्यामुळे या प्रकरणाचा गुंता आता वाढत चालला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी एमआयडीसी परिसरात २० जुलै रोजी छापा मारला होता. यावेळी ५० लाख किंमतीचे ९३६ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले होते. तसेच याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती. या आरोपींपैकी दोन आरोपी कोस्टगार्डचे कर्मचारी असल्याचे तपासात उघड झाले होते. या तिघांच्या चौकशीत आणखी दोन आरोपींची माहिती मिळाली. त्यांना पकडण्यासाठी तसेच, या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी प्रकरणातील मास्टर माईंड मुकेशला चेन्नईतून अटक केली.
धक्कादायक म्हणजे, मास्टर माईंड मुकेश हा वायूदलाचा कर्मचारी
मुकेश हा वायूदलाचा कर्मचारी असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने राजस्थान येथील अंकित सिंग याच्यामार्फत दिनेशकडे कोकेन दिले होते. तर रामचंद्र आणि मुकेश यांचे फोनवर वारंवार बोलणे होत होते. त्यामुळे पोलिसांनी मुकेशला चेन्नई येथून तर अंकित सिंग याला राजस्थान येथून ताब्यात घेतले. त्याला ३१ जुलैपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. हवाई दलात सेवेत असलेल्या मुकेशच्या अटकेची परवानगी स्थानिक न्यायालयाकडून देण्यात आली. त्यानंतरच त्याला अटक झाली. सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात अगोदर तटरक्षक दलाच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता वाढला होता. मात्र या दोघांच्या अटकेमुळे रत्नागिरीतील कोकेनचा खरेदीदार कोण? याचा सुगावा लागणे आता शक्य होणार आहे.