रत्नागिरी - रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांमध्ये पर्यटनामधून विकास करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्याकरिता विमानतळ आणि जेटीचीही आम्ही उभारणी करत आहोत. मोठ्या संख्येने जगभरातील पर्यटक कोकणात कसे येतील, याकरिता मी दिवसरात्र विचार करत असतो. फक्त विचारच नाही, तर त्यावर कामही सुरू केले आहे. त्याचबरोबर, नवीन उद्योग, टेक्स्टाईल पार्क उभारले जाईल, असा विश्वास पर्यटन तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. गुहागर विधानसभा मतदारसंघातील रामपूर येथील मिलिंद हायस्कूलच्या मैदानावर आयोजित सुवर्णभास्कर नोकरी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
हेही वाचा - रत्नागिरीतही शिवसेनेकडून निलेश राणेंविरोधात निषेध आंदोलन
नोकरी महोत्सवाचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काल शिवाई प्रतिष्ठान व यशस्वी अॅकेडमी फॉर स्कील यांच्या संयुक्त विद्यमाने रामपूर येथील मिलिंद विद्यालयाच्या पटांगणात सुवर्णभास्कर नोकरी महोत्सवाचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. सुवर्णभास्कर नोकरी महोत्सवात दहा हजारांहून अधिक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. सकाळी 9 वाजल्यापासून मिलिंद हायस्कूलच्या मैदानावर उमेदवारांच्या रांगा लागल्या होत्या.
कोकणात जगभरातून पर्यटक कसे येतील याकरिता प्रयत्न
आपल्या आजूबाजूला जे देश आहेत त्यांच्याकडील समुद्रकिनार्यांपेक्षा दहा पटीने सुंदर कोकणातील समुद्रकिनारे आहेत. पर्यटनातून कोकणात रोजगार निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही बीचशॅक्स, आंबा महोत्सव, कृषी पर्यटन, मान्सून महोत्सवाचे आयोजन करून कोकणात जगभरातून पर्यटक कसे येतील याकरीता प्रयत्न करत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
तरुणांनो मेहनत करा
आपल्याला नोकरी हवी असते, रोजगार हवा असतो, कधी संधी समोर चालून येते, तर कधी मेहनत करावी लागते. कधी आवडती नोकरी मिळते, तर कधी नावडती नोकरी मिळते. तुम्ही ज्या क्षेत्रात नोकरी कराल, त्या क्षेत्रात नंबर वन बना, प्रोफेशनल बना. त्याच जागेवर न थांबता पुढील तीन वर्षात प्रमोशन कसे होईल याकरिता मेहनत करा, असे आदित्य ठाकरे यांनी तरुणांना सांगितले.
मेहनतीत कमी पडू नका
नोकरी मिळाली आहे, थोडे दिवस करू मग बघू काहीतरी, असा विचार करू नका. जी नोकरी मिळाली आहे त्यात कष्ट करा. नेहमी मोठी स्वप्ने पहा. एक दिवस आपण कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष कसे होऊ या दृष्टीने मेहनत करा. जगातील सर्वोत्तम माणूस बनण्याचा प्रयत्न करा. प्रोफेशनल बना. आज सुवर्ण भास्कर नोकरी महोत्सवासाठी एका तासात 11 हजार अर्ज आले, ही काही चांगली गोष्ट नाही. मी स्वतः वरळीमध्ये पोलीस भरती शिबीर घेतले होते. त्यावेळीही सभागृह तूडुंब भरून बाहेर उमेदवार उभे होते. आज नोकरीसाठी तरुण काहीही करायला तयार आहेत, अशी खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी मुलाखतीनंतर निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीची नियुक्ती पत्रे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आली.
पर्यावरणाला हानी पोहचवणारे उद्योग नकोत
रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यावेळी म्हणाले की, कोरोनाच्या भीषण संकंटामुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळले. अनेकजण बेकार झाले. पुन्हा एकदा रोजगार निर्मितीसाठी राज्यसरकार उद्योगधंद्यांना चालना देत आहे. अनेक उद्योग राज्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोकणात पर्यावरणाला हानी न पोहोचवणारे उद्योग आले पाहिजेत. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. गुहागर आणि दापोली या दोन तालुक्यात पर्यटनवाढीची खूप मोठी संधी आहे. त्यासाठीही आम्ही प्रयत्न करत आहोत. त्या ठिकाणी रस्ते चांगले करण्याचा निर्णय जिल्हा नियोजनाच्या बैठकीत घेतला असल्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी सांगितले. सहा हजार तरुणांना रोजगार म्हणजे सहा हजार कुटुंबांना आर्थिक मदत असल्याचे महान कार्य या ठिकाणी घडणार आहे, असे अनिल परब यांनी सांगितले.
सहा हजार तरुणांना रोजगार देणार
सुवर्णभास्कर नोकरी महोत्सवातून सहा हजार तरुणांना नोकरी मिळवून देण्याची घोषणा आयोजक आमदार भास्कर जाधव यांनी केली. ते म्हणाले की, यापूर्वीही आम्ही याच ठिकाणी सुवर्णभास्कर नोकरी महोत्सव घेतला होता. त्यावेळी इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून दिला होता. आता मात्र सर्वच क्षेत्रातील तरुणांना आम्ही रोजगार मिळवून देणार आहोत. भविष्यात आणखी काही उपक्रम आम्ही राबवणार असून त्यामध्ये महिला मेळावा, समाजकल्याण विभागाचा मेळावा, अल्पसंख्यांक मेळावा आयोजित करणार असल्याचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले.
महोत्सवात पालकमंत्री अॅड. अनिल परब, नोकरी महोत्सवाचे आयोजक आमदार भास्कर जाधव, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, विलास चाळके, आमदार शेखर निकम, योगेश कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, उपाध्यक्ष महेश नाटेकर, शिक्षण सभापती सुनील मोरे, माजी सभापती अरुण कदम आदी उपस्थित होते.
हेही वाचा - रत्नागिरीत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची रॅली