रत्नागिरी - येथून जवळच्या मिऱ्या समुद्रात मध्यरात्री एक बोट बुडाल्याची घटना घडली. लाटांच्या तडाख्यात सापडल्याने ही बोट बुडाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या बोटीची नोंदणी नसतानाही ही बोट अनधिकृतपणे मासेमारीसाठी गेली होती.
हेही वाचा- पुण्यात पुराच्या पाण्यात एकाच गोशाळेतील 35 गायींचा मृत्यू
रुपेश नार्वेकर यांची मिनी पर्सेसीन नौका मासेमारीसाठी समुद्रात गेली होती. बुधवारी रात्री मासेमारी करुन परतत असताना मिऱ्या डोंगरासमोरील समुद्रात लाटांच्या तडाख्यात ही बोट सापडली आणि बुडू लागली. यावेळी बोटीवर 13 खलाशी होते. या सर्व खलाशांना वाचविण्यात यश आले. मात्र, बोटीला जलसमाधी मिळाली. त्यानंतर आज ही बोट किनाऱ्यावर आणण्यात आली. यामध्ये बोटीचे आणि जाळ्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान रजिस्ट्रेशन झाले नसताना ही बोट मच्छिमारीसाठी समुद्रात गेली होती. याबाबत मत्स्य विभागाशी संपर्क साधला असता याबाबत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्य विभागाकडून देण्यात आली आहे.