रत्नागिरी - संगमेश्वर तालुक्यातील उक्षी येथील नदीमध्ये कारसहित कोसळलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. ज्या ठिकाणी गाडी सापडली, त्या ठिकाणापासून ५०० मीटर अंतरावर या व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. करुणा मूर्ती असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
करुणा मूर्ती हे जिंदाल कंपनीत काम करतात. रविवारी दुपारी मूर्ती हे त्यांचे मित्र हेरंब कदम, अतुल करंदीकर, प्रसाद शिर्के, प्रशांत म्हात्रे आणि पराग पेडणेकर उक्षी धबधब्यावर गेले होते. त्यानंतर परत येत असताना त्यांची कार एका दगडावर आदळली व थेट नदीत कोसळली. त्यात करुणा मूर्ती कारमध्येच अडकले व बाकीचे बाहेर फेकले गेल्याने बचावले. कार नदीत कोसळल्याने त्यांचा मृतदेह मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने शोध घेणे सुरू होते.
मंगळवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास उक्षी परिसरातील नदी काठालगत काही ग्रामस्थांना एक कार तरंगताना दिसली. त्यानंतर ग्रामस्थांनी ती कार नदीतून बाहेर काढली. मात्र आतमध्ये करुणा मूर्ती नव्हते. त्यामुळे परिसरात शोध घेण्यात आला. दरम्यान, काही अंतरावर नदीच्या काठालगत त्यांचा मृतदेह अडकलेला दिसला. त्यानंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.