रत्नागिरी - दापोली तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथे एकाच घरातील तीन वृद्ध महिलांचा जळून मृत्यू ( Three Burnt Bodies Found Dapoli ) झाल्याची घटना शुक्रवारी समोर आली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ माजली असून, दापोली पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. हे तीनही मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळले आहेत.
मंदिराची किल्ली मागण्यासाठी गेले होते -
दापोली पालगड रोडवरील वणोशी या गावामध्ये खोतवाडी आहे. या वाडीतील एका घरामध्ये सत्यवती पाटणे (वय 75 वर्ष), पार्वती पाटणे (वय 90 वर्ष) या वृद्ध महिला राहत होत्या. त्यांच्या समोरच्या घरात त्यांचेच नातेवाईक इंदुबाई पाटणे (वय 85 वर्ष) या राहायला होत्या. सध्या दापोलीत थंडीचे दिवस असल्याने त्या घराची दारे खिडक्या बंद करून राहत असत, मात्र दररोज सकाळी त्या उन्हामध्ये बसत असत. त्यांच्या घराच्यासमोर त्यांचे कुलदैवत त्याचे मंदिर आहे. तेथे पूजा करण्याकरिता विनायक पाटणे हे दररोज सकाळी येतात त्यांना शुक्रवारी सकाळी या महिला बाहेर उन्हामध्ये बसलेल्या दिसून आल्या नाहीत, शिवाय त्यांना मंदिराची किल्ली देखील हवी होती, म्हणून ते किल्ली मागण्यांकरिता या महिलांच्या घरामध्ये गेले. मात्र आतून काही प्रतिसाद आला नाही मग त्यांनी घराच्या मागील बाजूचा दरवाजा लोटून पाहिला असता तो त्यांना उघडा असलेला आढळून आला, त्यांनी तो लोटून पाहिला यांनी ही बाब ग्रामस्थांना सांगितली.
घरात आढळले मृतदेह -
ग्रामस्थांना सांगितल्यावर सर्व ग्रामस्थांनी येऊन घटनेची खातरजमा केली असता, घरामध्ये तीन खोल्यांमध्ये तीन महिला मृतावस्थेत आढळून आल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी ही घटना तत्काळ त्यांचे मुंबईतील नातेवाईक यांना कळवली. हे नातेवाईक शुक्रवारी सायंकाळी मुंबईतून दापोलीत दाखल झाले. त्यानंतर दापोली पोलिस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे हे देखील आपल्या अधिकाऱ्यांसह शुक्रवारी सायंकाळी घटनास्थळी रवाना झाले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम पोलीस स्थानकात सुरू होते.
तीन ठिकाणी तीन वृद्ध महिलांचे मृतदेह ( Suspicious burnt bodies of three elderly women ) -
या महिला ज्या घरांमध्ये मृतावस्थेत आढळून आल्या, त्या घराचा पुढील दरवाजा का बंद होता व मागील दरवाजा उघडा होता. त्यातील सत्यवती पाटणे या पडवीमध्ये चुलीच्या जवळ मृतावस्थेत जळलेल्या अवस्थेत आढळून आल्या. शिवाय पार्वती पाटणे या अनेक वर्ष जागेवरच असल्याने त्या दुसऱ्या खोलीमध्ये जळलेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्या. इंदुबाई पाटणे या त्यांच्या समोरच्या घरात राहणाऱ्या त्यांच्या दुसऱ्या नातेवाईक होत्या. त्या या दोन महिलांच्या घरातील हॉलमध्ये मृतावस्थेत आढळून आल्या. शिवाय या घराचा दरवाजा आतल्या बाजूने बंद होता यामुळे संशय व्यक्त करण्यात येत आहे. दापोली पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - Skulls Found in Biogas Wardha : बायोगॅसमधून मिळाली 12 वी कवटी; तपासासाठी विशेष पथकाची स्थापना