रत्नागिरी - रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी गुहागर येथील जाहीर सभेत शिवसेनेवर जोरदार शाब्दिक प्रहार केला. शिवसेनेच्या गुहागरमधील सभेत उद्धव ठाकरेंसह एकही नेता विकासावर बोलला नाही. त्यांनी केवळ मला लक्ष्य केले. तुम्ही स्वतःचे अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यांवर बोलता. स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून हा तुमचा धंदा आता कोकणवासीय पुढच्या काळात सहन करणार नाहीत, अशी टीका तटकरे यांनी शिवसेनेवर केली.
तटकरे म्हणाले की, माझ्या विरुद्ध चौकशी सुरू आहे, पाच वर्षांपूर्वी माझ्यावर आरोप झाले, पण एकही आरोप सिद्ध झालेला नाही. तुम्ही स्वतःचे अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यांवर बोलता, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली. तसेच अनंत गीते यांनी कुणबी समाजासाठी काहीच केले नाही. केवळ आश्वासने दिली. आपण खासदार झाल्यावर चारही तालुक्यांमध्ये कुणबी भवन उभारु, असे आश्वासन यावेळी तटकरे यांनी दिले.