रत्नागिरी - लघुशंकेसाठी गेलेल्या इसमाचा पाय घसरून गड नदीत वाहून गेलेल्या इसमाला पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर वाचवण्यात यश आलं आहे. राजाराम आत्माराम घाग असे त्यांचे नाव आहे.
सकाळची घटना
गेले चार दिवस संगमेश्वर भागात संततधार पाऊस लागत असल्याने गडनदी धोक्याच्या पातळीवरून भरून वाहत आहे. आज (शुक्रवार) सकाळी ७ वाजता चिपळूण तालुक्यातील नायशी येथील ८३ वर्षीय राजाराम आत्माराम घाग हे आपल्या कामाकरिता कोंडिवरे येथे निघाले होते. याच दरम्यान ते लघुशंकेसाठी नदीजवळ गेले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा तोल गेला. आणि पाय घसरल्याने ते नदीपात्रात तोल जाऊन कोसळले व वाहून गेले. सुदैवाने ते एका झाडीत अडकले. त्यांनी झाडी पकडून ठेवली. ही बाब तुषार जड्यार यांच्या निदर्शनास आली. यानंतर ग्रामस्थ जमा झाले. संगमेश्वर पोलीस कोंडिवरे येथे घटनास्थळी पोहचले.
अमित कुंभारचं धाडस -
माखजन येथील पट्टीचा पोहणारा अमित गोपाळ कुंभार याने नदीच्या पात्रात उडी घेत राजाराम घाग यांच्या कंबरेला दोरीने बांधून बाहेर काढले. या बचाव कार्यात काळंबुशी, कोंडिवरे येथील ग्रामस्थ सहभागी झाले. दुपारी १२ वाजताच्या दरम्यान राजाराम घाग यांची पाण्यातून सुखरूप सुटका करण्यात आली.