रत्नागिरी - सोमवारपासून शाळांना सुरुवात झाली आहे. परंतु राजापूर तालुक्यातील रायपाटण शाळा नं 1 मध्ये मुलांना न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे. ही शाळा अतिशय धोकादायक असून, वासे-कौले पडू लागली आहेत. त्यामुळे या शाळेत मुलांना न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे. वारंवार याबाबत पत्राद्वारे मागणी करूनही जाणूनबुजून शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या शाळेत 65 विद्यार्थी आहेत. मात्र, या शाळेची दुर्दशा एवढी झाली असून केव्हाही शाळेची कौले डोक्यावर पडून दुर्घटना होऊ शकते.
या शाळेचे जिल्हा परिषदेने निर्लेखन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शाळेच्या जमिनीबाबतदेखील वाद आहेत. मात्र, जिल्हा परिषद अधिकारी कागदी घोडे नाचवण्यापलीकडे काहीही करत नाहीत, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. लोकप्रतिनिधीदेखील याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे अशा धोकादायक शाळेत मुलांना न पाठवण्याचा निर्णय रायपाटण सरपंचांनी घेतला आहे. दरम्यान, आज शाळेच्या पहिल्याच दिवशी मुले शाळेत जाणार नाहीत हे समजताच पालकांनी मुलांना शाळेत पाठवावे, अशी विनंती केंद्रप्रमुखानी केली आहे.