रत्नागिरी - कोकण किनारपट्टीला पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. नैऋत्य अरबी समुद्र आणि हिंदी महासागरातील विषुववृत्तीय क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाले आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर सोबा चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. या वादळाचा कोकण किनारपट्टीला धोका आहे, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
या वादळामुळे कोकण किनारपट्टीवर ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 6 डिसेंबरपर्यंत या वादळाचा परिणाम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा - 'नाणार'प्रकरणी गुन्हे मागे; प्रकल्पग्रस्तांचा जल्लोष
ऑक्टोबर महिन्यात कोकण किनारपट्टीला 'क्यार' चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. त्यावेळी शेतकरी आणि मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले होते. कोकणातील पर्यटन व्यवसायालाही याचा मोठा फटका बसला होता. आता पुन्हा सोबा चक्रीवादळाचे संकट किनारपट्टीवर घोंगावत आहे. बुधवारपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी तुरळक पाऊसही पडला.