रत्नागिरी- कोकणातील लोकांनी आपलं आणि शिवसेनेचं नातं अभेद्य आहे हे सिद्ध करून दाखवून दिलेले आहे. आज नारायण राणे सूक्ष्म खात्याचे मंत्री असोत किंवा त्यांना उद्या पंतप्रधान बनवले तरी सुद्धा कोकणातून शिवसेनेला हटविणे हे कोणाच्याही ऐपतीमध्ये नाही. कोकण आणि शिवसेना हे अभेद्य नाते तोडण्याचं काम कोणीही करू शकत नाही, असा विश्वास व्यक्त करत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री राणे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.
महाराष्ट्राला फक्त चार मंत्रीपद मिळतात हेच मोठं दुःख -
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी झालेला आहे. महाराष्ट्रातून चार जणांची वर्णी या मंत्रिमंडळात लागली असली तरी महाराष्ट्रातीलच दोन जणांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. याबाबत खासदार विनायक राऊत म्हणाले की, एवढ्या मोठ्या महाराष्ट्राला केंद्रीय मंत्रिमंडळात फक्त चार मंत्रीपद मिळतात हेच मोठं दुःख आहे. प्रकाश जावडेकर यांच्यासारखा कार्यक्षम मंत्री बाहेर जातो याचं दुःख फार मोठं आहे. तसेच महाराष्ट्राला मंत्रिपद देत असताना अन्याय झाला असल्याचंही राऊत यावेळी म्हणाले.
पराभव काय असतो हे शिवसेनेने नारायण राणेंना दाखवून दिले आहे -
शिवसेनेशी लढण्यासाठी ज्यांची ताकद नाही अशांनी एखाद्या नारायण राणे किंवा अन्य कोणाचा वापर करायचा ठरवलं असेल तर तो त्यांचा भ्रमनिरास आहे. पराभव काय असतो ते यापूर्वी अनेक वेळा शिवसेनेने नारायण राणेंना दाखवून दिले असल्याचं सांगत खासदार राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपवर टीका केली. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राणेंना मंत्रिपद देण्यात आलं का? यावर बोलताना राऊत म्हणाले की, मुंबई महालापालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी आजपर्यंत अनेकांनी प्रयत्न केले. पण मुंबई आणि शिवसेना हे नातं मागच्या 30 वर्षांपासून अभेद्य आहे. येत्या निवडणुकीत सुद्धा शिवसेना आणि महाविकास आघाडीचाच भगवा मुंबई महापालिकेवर फडकेल, तो उतरविण्याची ताकद कोणामध्ये नसल्याचं खासदार राऊत यावेळी म्हणाले.
राणेंनी स्वीकारला पदभार-
नारायण राणे यांना केंद्रीय मंत्री मंडळात सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला आहे. बुधावारी शपथविधी पार पडल्यानंतर आज नवीदिल्लीत त्यांनी मंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. राज्यात राणे आणि शिवसेना यांच्यातील राजकारण सर्वांनाच माहिती आहे. शिवसेने विरोधात बळ देण्यासाठीच राणेंना मंत्री पद दिले असल्याची चर्चा आहे. त्यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी निशाणा साधला आहे.