रत्नागिरी - शिवसेना आणि राणे यांच्यातला वाद पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. दसरा मेळाव्यातून मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणेंचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार प्रहार केला होता. त्यानंतर खासदार नारायण राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. या टीकेला आता शिवसेनेकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी खरपूस समाचार घेत राणेंवर जोरदार हल्ला केला आहे. आपल्या व्हिडिओ संदेशात विनायक राऊत म्हणाले, की नाव न घेता दिलेले उदाहरण जसे काही माझ्यासाठीच आहे, हा ठाम विश्वास या गृहस्थाला झाला. या गृहस्थाने आज पुन्हा एकदा डराव डरावगिरी करायला सुरुवात केलेली आहे. पावसाळा जरी संपला असला तरी या डरावडरावगिरी करणारांची डरावगिरी संपलेली नाही. पण यांच्या डरावगिरीने कोणी घाबरत नाही, कारण यांची पात्रता काय आहे, हे यापूर्वीच रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जनतेने दाखवून दिले आहे, अशी जोरदार टीका खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर केली आहे.
ते पुढे म्हणाले, की नारायण राणे यांना एकच सांगायचं आहे, तुम्ही मुख्यमंत्री होतात, पण तुम्ही त्या मुख्यमंत्रीपदाला काळीमा फासणारी अश्लाघ्य भाषा आजच्या मुलाखतीत वापरलीत, तुम्हाला पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनता तुमची जागा दाखवेल, अशी घणाघाती टीका खासदार विनायक राऊत यांनी केली.