रत्नागिरी - दापोली तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्टची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमैयांना शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीच पुरवल्याचा आरोप खेडचे राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, या आरोपानंतर मोठी खळबळ उडाली आहे.
इतकेच नाही तर त्यांनी पुराव्यासाठी मोबाईल वरील संभाषणाच्या ऑडिओ क्लीपच पत्रकार परिषदेत सादर केल्या. आमच्या महाविकास आघाडीत काही सुर्याजी पिसाळ तयार झालेत असाही खळबळजनक आरोप त्यांनी यावेळी केला. खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर व माजी आमदार संजय कदम यांची संयुक्त पत्रकार परिषद आज (शनिवारी) खेड येथे झाली.
रामदास कदम यांनी कॉल केला...
यावेळी माजी आमदार संजय कदम म्हणाले की, आमची भूमिका ही कोकणातील पर्यटन व्यवसायाच्या बाजूने आहे. रामदास कदम व पालकमंत्री अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांच्यात वाद असतील तर त्यांनी परस्पर करावे. मात्र, यांच्या वादाचा त्रास जर आमच्या पर्यटन व्यावसायिकांना होत आहे. ही कोकणातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही. प्रसाद कर्वे माहितीचा अधिकार वापरून काही गोष्टी करत असेल आणि रामदास कदम हे त्याचा उपयोग यासाठी करत असतील तर तो कर्वे त्यांनाही भविष्यात भारी पडेल. ज्यांनी मोबाईलवर कॉल रेकॉर्ड ठेऊन रामदास कदम यांना कॉल केला याचा अर्थ स्पष्ट आहे, असे संजय कदम यांनी सांगितले. आम्ही या सगळ्याचे पुरावे आमच्या नेत्यांकडे दिले आहेत अशीही माहिती माजी आमदार संजय कदम यांनी दिली. किरीट सोमैयांची जर पुन्हा वक्रदृष्टी पडली तर आम्ही त्यांना रोखू, असा इशारा मनसेचे कोकण विभागीय संघटक नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दिला.
हेही वाचा - ...म्हणून भाजपाला ज्योतिष बदलण्याची गरज; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची खोचक टीका
आरोपाबाबत शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम काय म्हणाले?
रामदास कदम यांनी या क्लिपबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या क्लिप्स बनावट असल्याचे सांगितले आहे. त्या क्लिप्ससोबत माझा काहीही संबंध नाही, असेही ते म्हणाले आहे.