रत्नागिरी - कोरोनामुळे जनतेचे हाल सुरू असताना भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन कोरोनाच्या नावावर राजकारण करत आहेत. केवळ उलट-सुलट वक्तव्य करण्यापेक्षा कोरोना काळात जिल्हाध्यक्ष पटवर्धन आणि रत्नागिरी जिल्हा भाजपाने जनतेसाठी काय योगदान दिले ते सांगावे. जनता सुज्ञ असून कार्यालयात बसून पत्रकबाजी करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना जनता योग्य जागा दाखवेल, अशी टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी भाजप व जिल्हाध्यक्षांवर केली आहे.
दरम्यान, चाकरमानी हे आपल्याच रत्नागिरीकरांचे रक्ताचे नातेवाईक आहेत. ते आपल्या घरी येत आहेत कुणी परप्रांतीय जिल्ह्यात येत नाही, इतकी तरी जाण भाजपच्या जिल्हाध्यक्षांना असायला हवी. पण, त्यांच्या डोक्यात राजकारणाचा विषाणू पसरला असून हे राजकारण भविष्यात त्यांच्या पक्षासाठी घातक ठरेल. केवळ तोंडाची बडबड बंद करून तोंडाला मास्क लावून भाजप जिल्हाध्यक्षांनी कोरोनाकाळात मदतीसाठी पुढे यावे, असा खोचक सल्लाही जिल्हाप्रमुख चाळके यांनी पटवर्धन यांना दिला आहे.
चाळके पुढे म्हणाले की, कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून भाजपचे राजकारण सुरू आहे. सुरुवातीला चाकरमान्यांना गावी येऊ द्या, त्याची चेकपोस्टवर तपासणी करा, असे सांगणारे भाजपचे पदाधिकारी आता चाकरमान्यांना आणू नका, आरोग्य यंत्रणेवर ताण पडेल, अशी वक्तव्य व पत्रबाजी करत आहेत. आपण अशी पत्रकबाजी केली की आपण जनतेची बाजू मांडत आहोत असा त्यांचा गैरसमज होत आहे. प्रत्यक्षात कोरोना आल्यावर तुम्हाला डॉक्टर नाहीत , आरोग्य कर्मचारी नाहीत हे कळलं का? त्याआधी कधी सामान्य रुग्णांना पहायला जिल्हा रुग्णालयात गेला असतात तर आरोग्य विभागाची अवस्था काय आहे ती कळली असती अशी टीका चाळके यांनी केली.
आरोग्य यंत्रणेवरुन राजकारण करण्यापेक्षा कर्मचारी कमतरता असतानाही जे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय जीवावर बेतून काम करत आहेत त्यांचे कौतुक करा, महाराष्ट्र सरकार आज कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहे. चाकरमान्यांना सुरक्षित गावी आणत असताना तुमच्यामध्ये पोटदुखीची लक्षणे दिसू लागली असल्याचा टोलाही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांना लागावला आहे. आज राजकारण बाजूला ठेऊन जनतेसाठी जर तुम्ही मदतीसाठी पुढे आलात तर त्याचे श्रेय कोणत्याही बचतीच्या व्याजापेक्षा मोठे असेल, असा चिमटा त्यांनी काढला.