रत्नागिरी - नीलेश राणे यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी रस्त्यावर येऊन आमच्याशी दोन हात करावेत, आम्ही तयार आहोत, असा इशारा शिवसेनेने माजी खासदार नीलेश राणे यांना दिला आहे. लोकसभा मतदारसंघ कोकण समन्वयक प्रदीप बोरकर आणि शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांनी रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत हा इशारा दिला. माजी खासदार नीलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल बोलताना बोरकर आणि मोरे यांनी हा इशारा दिला.
काय म्हणाले होते नीलेश राणे?
राणे आणि शिवसेना यांच्यात सध्या जोरदार वाक् युद्ध रंगले आहे. नीलेश राणे यांनी एक व्हिडिओ जारी करत शिवसेना खासदार विनायक राऊत यांना थेट आव्हान दिले होते. 'आमच्यावर टीका करताना जी भाषा वापरली जात आहे ती बदलली नाही, तर जिथे दिसाल तिथे मी तुम्हाला फटके घालीन', असे आव्हान दिले होते.
'रस्त्यावर येऊन आमच्याशी दोन हात करावेत'
याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना समन्वयक प्रदीप बोरकर म्हणाले, की नीलेश राणे यांच्या वक्तव्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो. खासदार म्हणून राहिलेल्या व्यक्तीने असे वक्तव्य करणे त्यांना शोभा देत नाही. नीलेश राणे हे कुठल्या धुंदीत असतात हे सर्वांनाच माहिती आहे, त्यामुळे त्यांचे वक्तव्य फार मनावर घेऊ नये. खासदार विनायक राऊत यांनी प्रचंड मताधिक्याने नीलेश राणे यांना हरविले आहे. त्याचे शल्य त्यांना आहे. त्यामुळे ते असे कुठेतरी वक्तव्य करून आपले शल्य दाखवत असतात. त्यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी रस्त्यावर येऊन आमच्याशी दोन हात करावेत, आम्ही तयार आहोत. शिवसैनिक हे शिवसैनिक आहेत, शिवसैनिकांकडे पेशन्स आहे तोपर्यंत ते शांत राहतील, एकदा पेशन्स जर संपले की शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवू शकतील. त्यांच्यापेक्षा डबल फटके आम्ही देऊ शकतो, त्यांनी रस्त्यावर आमच्या समोर यावे, असा इशारा बोरकर यांनी यावेळी दिला.
'आम्ही तुम्हाला शुद्धीवर आणू'
नीलेश राणे शुद्धीत नसताना अशी वक्तव्य करतात, आम्ही वाट पाहतोय. तुम्ही या खासदार विनायक राऊत यांच्या अंगावर, आम्ही तुम्हाला शुद्धीवर आणू, असे आव्हान शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांनी दिले आहे.