रत्नागिरी - राज्यसभेत खासदारांच्या शपथविधी सोहळ्यात उदयनराजे भोसलेंनी शपथ घेतल्यानंतर 'जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा दिली होती. त्यावेळी सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेत त्यांना समज दिला होता. याप्रकरणाचे गुरुवारी रत्नागिरीतही पडसाद उमटले. जिल्ह्यातील शिवसैनिकांनी व्यंकय्या नायडूंचा पुतळा जाळत निषेध केला.
राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा बुधवारी दिल्लीत पार पडला. यावेळी उदयनराजे भोसले यांनीही राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली होती. त्यावेळी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र; जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. यावर सभापती व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त केली. “हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नसून माझ्या दालनात होत आहे, हे रेकॉर्डवरही घेतलं जात नाही आहे. सभागृहात कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. भविष्यात हे लक्षात ठेवा’, अशी समज यावेळी व्यंकय्या नायडू यांनी दिली होती. या प्रकरणाचा सध्या राज्यात जोरदार निषेध करण्यात येत आहे. शहरात शिवसेनेच्या वतीने व्यंकय्या नायडूंचा निषेध करण्यात आला. खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयासमोर व्यंकय्या नायडूंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यादरम्यान, 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणा देत या घटनेचा निषेध केला. यावेळी जिल्हाप्रमुख विलास चाळके, रत्नागिरी तालुकाप्रमुख तथा रत्नागिरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा - 'जगभर लुंगी घालून फिरणाऱ्या व्यंकय्या नायडूंचा शिवरायांच्या घोषणेला विरोध का?'