रत्नागिरी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. "रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!" असे ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. उद्धव ठाकरेंना एकप्रकारे त्यांनी टोला लगावला आहे. यावरून शिवसेना खासदार, सचिव विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. 'एकनाथ शिंदे यांच्या विदवत्तेबद्दल संशोधन करावे लागेल, कुणीतरी लिहून द्यायचे आणि ट्वीट करायचे, त्यांना स्वतःच्या हातून तरी ट्वीट करता येते का? याचा मला अभ्यास करावा लागेल, अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे. ते आज रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
'..त्याचा मला आता पश्चाताप होते आहे' - एकनाथ शिंदे यांना माझ्या मध्यस्थीमुळे विधानसभेची उमेदवारी मिळाली. त्यावेळी मी ठाण्याचा संपर्कप्रमुख होतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नेते सतीश प्रधान यांना ए बी फॉर्म दिला होता, पण मी मध्यस्थी केली आणि एकनाथ शिंदे यांना पहिल्यांदा आमदारकीची उमेदवारी मिळाली. पण त्याचा आता मला पश्चाताप होतो आहे. आयुष्यातील मोठे पाप झाले आहे. मी सांगितलं नसते तर एकनाथ शिंदेना आमदारकी मिळाली नसती. त्यामुळे एकनाथ शिंदे पहिल्या वेळी आमदार कोणामुळे झाले. हे त्यांनी आपल्या आई-वडिलांची शपथ घेऊन सांगावे, असे विनायक राऊत यावेळी म्हणाले.
शिवसैनिकांचा निर्णय - प्रतिज्ञापत्राच्या निर्णयाबाबत बोलताना खासदार राऊत म्हणाले की, आम्हाला निवडणूक आयोगाला दाखवायचे आहे, की शिवसेनेची सदस्य संख्या किती आहे. आमची निष्ठा कोणाशी आहे. यासाठी आम्ही शिवसैनिकांनी घेतलेला हा प्रतिज्ञापत्राचे निर्णय आहे. हा पक्षप्रमुखांचा आदेश नाही, असे विनायक राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान आपल्या गद्दारीचं खापर कोणावर तरी फोडायचं यासाठी शंभुराजे देसाई खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप करत असल्याचंही खासदार विनायक राऊत म्हणाले.
धनुष्यबाण घेण्याचा नैतिक अधिकार नाही - धनुष्यबाण निर्माण गुलाबरावांच्या बापजाद्याने केलेलं नाही, ते आमच्या बापजाद्याने म्हणजेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेले आहे. धनुष्यबाण घेण्याचा नैतिक अधिकारी गुलाबराव आणि कंपूला नाही, अशी टीका विनायक राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर केली आहे.
हेही वाचा - Bhaskar Jadhav Farming : शिवसेनेचे आक्रमक भास्कर जाधव रमले पेरणीच्या कामात; पाहा त्यांचा भलरीचा Video