रत्नागिरी - दुबईहून आलेलं एयर इंडियाचं विमान केरळमधील कोझिकोड विमानतळावर उतरल्यानंतर या विमानाला अपघात झाला. या अपघातामध्ये पायलट दिपक साठे आणि सह-पायलट कॅप्टन अखिलेश कुमार यांच्यासह 18 जणांचा मृत्यू झाला. मात्र, आपल्या जीवाची बाजी लावत या दोघांनी अन्य प्रवाशांचा जीव वाचवला. त्यांच्या मृत्यूने 'शिरळ' गावात हळहळ व्यक्त होत आहे.
या विमान अपघातात स्वतःच्या जीवाची बाजी लावून प्रवाशांचा जीव वाचवणारे दिपक साठे हे मूळचे चिपळूणचे सुपुत्र आहेत. नागपूरला स्थायिक झालेले साठे यांचे मूळ गाव चिपळूण तालुक्यातील शिरळ आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच शिरळ गावातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नागपूरला स्थायिक असले तरी गावाशी त्यांची नाळ कायम होती. त्यांच्या आठवणी सांगताना त्यांचे चुलत बंधू प्रकाश साठे यांनाही गहिवरून आले.
दिपक साठे यांचे आजोबा दामोदर भास्कर साठे हे शिक्षणासाठी नागपूरला गेले व तेथेच स्थायिक झाले. याबाबत बोलताना प्रकाश साठे यांनी सांगितले की, 'दिपकचे आजोबा दामोदर साठे, माझे आजोबा श्रीपाद साठे तर अन्य विष्णू व शांताराम असे हे चार भाऊ. सर्वाचे शिरळ येथे एकत्र कुटुंब आणि एकच घर. मात्र, दिपकचे आजोबा दामोदर वयाच्या 20 व्या वर्षीच नोकरीनिमित्त नागपूरला गेले आणि पुढे तेथेच स्थायिक झाले. नागपुरात स्थायिक असले तरी गावाकडे त्यांचे येणं-जाणं असायचं. दिपक यांचे आजोबा गावी येत असत, त्यावेळी दिपकही त्यांच्यासोबत गावी यायचे, मे महिन्यात, उत्सवानिमित्तही त्यांचं गावी येणं असायचं, दिपकही गावी यायचे. मात्र, अलीकडे कामाच्या व्यापामुळे त्यांचं येणं कमी झालं होतं. पण फोनवर संपर्क असायचा असं प्रकाश साठे यांनी सांगितले.
दिपक यांचे वडील लष्करात कर्नल होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांची दोन्ही मुले सैन्यात भरती झाली. दिपक यांचे मोठे भाऊ विवेक हेदेखील पायलट होते. फरोजपूर येथे 1981 मध्ये झालेल्या विमान अपघातात त्यांना वीरमरण झाले. हवाईदलात आधिकारी राहिलेले दिपक हे कुशल लढाऊ वैमानिक होते. ते 1981 साली हवाई दलात वैमानिक म्हणून रुजू झाले, 2003 पर्यंत त्यांनी हवाईदलात लढाऊ वैमानिक म्हणून सेवा केली. 2003 मध्ये त्यांनी विंग कमांडर म्हणून सेवानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर ते एअर इंडीयामध्ये रूजू झाले होते. दिपक साठे यांना त्यांच्या कर्तृत्वाच्या बळावर वायुसेना अकादमीकडून प्रतिष्ठित 'स्वर्ड ऑफ ऑनर' पुरस्कार मिळाला होता. एअर इंडियाचे एअरबस 310 विमान आणि बोईंग 737 अशा विमानांचं उड्डाण करणारे दीपक साठे हे देशातील मोजक्या पायलटांपैकी एक होते.
कर्तृत्ववान दीपक साठे यांची मूळ गावाशी नाळ कायम होती. दिपक हा धाडसी होता, दीपक यांनी दहा वर्षांपूर्वी शिरळला भेट देऊन काही दिवस मुक्कामही केला होता. मात्र, त्यानंतर त्यांचे येणे झालेले नसले तरी संपर्क मात्र कायम होता. दीपक यांना जमीन घ्यायची होती, याबाबत दिपक यांच्याशी मोबाईलवर बोलणे झाल्याचे प्रकाश साठे सांगतात. मात्र, विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचं समजलं आणि धक्काच बसल्याचं प्रकाश साठे यांनी सांगितले. दिपक आज आमच्यात नाही याचं दुःख आहेच, मात्र त्यांनी जे धाडस दाखवलं आणि जे कर्तृत्व गाजवलं त्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याची भावना प्रकाश साठे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.