रत्नागिरी - निसर्ग चक्रीवादळात कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. घरांचेही फार मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे अनेकांचे स्थलांतर करावे लागेल अशी स्थिती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना चांगल्या प्रकारची घरे कशी देता येतील याबाबत राज्य आणि केंद्र सरकारला विचार करावा लागेल, असे कोकण दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच नुकसानग्रस्तांना अधिक अर्थसहाय्य करण्याची गरज आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
रायगडनंतर आज रत्नागिरी जिल्ह्यातील वादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पवार यांनी पाहणी केली, लोकांशी संवाद साधला. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुनील तटकरे, मंत्री उदय सामंत, माजी आमदार संजय कदम, आमदार योगेश कदम आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, निसर्ग वादळामुळे कोकणात मोठे नुकसान झाले आहे. मत्स्य व्यवसाय, शेती याबाबतचे मदतीचे जे निकष आहेत ते बदलून मदत देण्याची गरज आहे. याबाबत राज्य शासनाला सूचित करण्यात येईल. आंबा, नारळ, सुपारी यांचे पंचनामे सुरू आहेत. त्याची मिळणारी नुकसान भरपाई यामध्ये त्या बागायतदार यांचे भागणार नाही तर त्यांची आगामी उत्पन्नाचे सोर्स लक्षात घेऊन त्यांना मदत देण्याचा विचार झाला पाहिजे, असे देखील पवार म्हणाले.
संकट येत असतात, पण यावेळी आलेले संकट मोठे आहे. यामध्ये घरांचे मोठे नुकसान आहे. त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना सांगून त्यांना चांगल्या प्रतीची घरे मिळतील यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत या व्यक्तीला उभे करण्यासाठी अधिक अर्थसाहाय्यची गरज असल्याचेही पवार यावेळी म्हणाले.
उद्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सर्व स्थिती सांगणार
कोकणातील नुकसानीची सर्व स्थिती उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीत मांडणार असल्याची माहिती पवार यांनी दापोलीत पत्रकार परिषदेत दिली. आजच आपल्याला मुख्यमंत्र्यांचा फोन आला, आणि उद्या तातडीने या नुकसानीबाबतच्या बैठकीसाठी मुंबईला बोलावले असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. कोकणवासियांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी ठोस भूमिका आम्ही सर्वजण त्या ठिकाणी घेणार आहोत, अशी माहिती पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.