रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात लंडनवरून आणखी 7 जण आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. 5 डिसेंबरनंतर जिल्ह्यात आलेल्या आणखी 7 जणांची यादी जिल्हा आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाली आहे. या यादीतील लोकांशी संपर्क साधण्याचे काम सुरू झाले आहे. या नव्या यादीत चिपळूण, रत्नागिरी, दापोली, देवरुख येथील नागरिक आहेत.
सध्या लंडन, इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार सापडला आहे. त्यामुळे लंडनमध्ये नवीन कोविड रुग्णांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. लंडनमध्ये सध्या असणाऱ्या कोविड रुग्णांमध्ये 60 टक्के रुग्ण हे नवीन प्रकारच्या कोरोना विषाणूमुळे झालेल्या संसर्गाचे आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने ब्रिटनमधून भारतात येणारी सर्व विमानं 22 डिसेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत स्थगित केली आहेत. मात्र 22 डिसेंबरपूर्वी अनेकजण लंडनहून भारतात आले आहेत. त्या सर्वांची तपासणी आरोग्य यंत्रणा करत आहे.
आरोग्य यंत्रणा सतर्क
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी 9 जण दाखल झाले होते. सुरक्षेच्या कारणास्तव या सर्वांची स्वॅब टेस्ट करून त्यांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येत आहे. मात्र, आणखी 7 जण लंडनहून जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेला मिळाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.