रत्नागिरी - गावातील उत्सव हे वेगवेगळे असतात. तिथल्या प्रथा, परंपरा आणि जत्रा यांचे एक वैशिष्ट असते. कुठे आगाडा-बगाडा तर कुठे भरणाऱ्या मोठमोठ्या यात्रा परंपरेनुसार आजही सुरू आहेत. अशाचप्रकारे गुहागरमधील भंडारी समाजाने सुरू केलेला 'समा' हा उत्सव वर्षानुवर्षे आजही सुरु आहे. या उत्सवावरील ईटीव्ही भारतचा हा स्पेशल रिपोर्ट.
महाराष्ट्रात मातीचा रंग बदलला, पाण्याची चव बदलली की तिथल्या परंपरा, उत्सव, प्रथा हे सर्वच बदलतात. गावोगावच्या जत्रा आणि त्यांचे वैविध्य हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. मग एकेका प्रथेसाठी एकेक जत्रा वा उरूस वा उत्सव प्रसिद्ध असतो. प्रत्येकाचे वैशिष्ट्य निराळे असते. असाच एक प्रसिद्ध उत्सव म्हणजे गुहागर तालुक्यातील समा उत्सव. गुहागरमधील भंडारी समजाने १८९० साली हा उत्सव सुरू केलेला आहे. पालखीबरोबर लोटण्या घेण्याचे मर्दानी खेळ हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण आहे.
१५ गावातील तरूण आपली ताकद आजमावण्याचे काम या निमित्ताने करतात. येथील तरूण आपली शक्ती पणाला लावत या पालखीबरोबर लोटण्या घेतात. कमरेला टॉवेल आणि अंगात बनियन घातली की मग लोटण्याची स्पर्धा रंगते. लोटण्या घेण्यासाठी डोलारा हा लाकडाचा आहे. दोन्ही गावातील मंडळी डोलारा उचलतात. त्यानंतर हा डोलारा तरूणांच्या मांडीवर दिला जातो. मग यातील तरूण हा डोलारा ताकदीने विरूद्ध दिशेला ढकलण्याचा प्रयत्न केला जातो. येथेच खऱ्या ताकदीचा कस लागतो. रात्री सुरू झालेला हा समा पहाटेपर्यंत असाच सुरू असतो.
समा या उत्सवाला एक अनन्य साधारण महत्व आहे. 'समा' याचा खरा अर्थ 'समाजासाठी समानता देणारा उत्सव'. समाजाला एकत्र आणण्याची ही समाज प्रबोधनाची भावना या उत्सवामागे आहे. त्याचबरोबर समाजातील तरूण मुले तंदुरुस्त राहावे, यासाठी या मर्दानी उत्सवाचे आयोजन दरवर्षी केले जाते. म्हणूनच आजही हा समा उत्सव आपले वेगळेपण टिकवून आहे.