रत्नागिरी - लॉकडाऊनमुळे बंद असलेली रत्नागिरीतील सलून दुकाने अखेर तीन महिन्यानंतर सुरू झाली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही अटी शर्थींवर राज्यातील सलून उघडण्याची परवानगी राज्य सरकारने दिली होती. त्यानुसार योग्य ती खबरदारी घेत आजपासून सलून दुकाने सुरू झाली आहेत.
कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे गेले तीन महिने सलून व्यवसाय बंद आहे. त्यामुळे सलून चालकांना घरखर्च भागवणे कठीण झाले होते. शिवाय व्यवसाय बंद असला तरी दुकान भाडे तसेच लाईट बिल भरावे लागते. त्यामुळे सलून सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी गेले काही दिवस सलून व्यावसायिकांकडून होत होती. विमान सेवा , एसटी सेवा , दारू विक्रीसाठी जे फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम आहेत, त्याप्रमाणेच नियम पाळून सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी सलून व्यावसायिकांनी केली होती. त्यासाठी राज्यातील सलून व्यावसायिकांनी गेले काही दिवस आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर राज्य सरकारने काही अटी शर्थींवर आजपासून (रविवार) सलून सुरू करण्यास परवानगी दिली.
या पार्श्वभूमीवर आजपासून रत्नागिरी जिल्ह्यात देखील सलून सुरू झाली आहेत. सलून सुरू झाल्याने रत्नागिरीतल्या अनेक सलून दुकानांच्या बाहेर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबदारी घेवून सलून सुरु झाली आहेत. केस कापणाऱ्या कामगारांना सुरक्षेची योग्य ती साधने देवून रत्नागिरीत आजपासून केस कापण्यास सुरुवात झाली. ग्राहकालाही मास्क अनिवार्य करण्यात आलं आहे. तसेच आलेल्या ग्राहकांची नोंद करण्यात येत आहे. सॅनिटायझरचा वापर करण्यात येत वस्तूंचं निर्जंतुकीकरणही करण्यात येत आहे. मात्र, आता सलूनमध्ये केस कापण्यासाठी तब्बल 100 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी केस कापण्यासाठी ६० रुपये मोजावे लागत होते.